|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कोरगाववासियांची पाण्यासाठी परवड थांबवा

कोरगाववासियांची पाण्यासाठी परवड थांबवा 

प्रतिनिधी/ पेडणे

तुये ते कोरगावपर्यंत टाकण्यात येणारी जलवाहिनी तेरेखोल येथे होणाऱया गोल्फ कोर्सपर्यंत नेली जात असले व त्याचा कोरगाववासियाना कोणताच फायदा होत नसल्यास ते काम त्वरित बंद ठेवावे. तसेच गैल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी होणारी परवड थांबहून त्वरित ग्रामस्थांना मुबलक पाणी उपलब्ध करावे. याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी कोरगाव येथे रविवारी झालेल्या खास ग्रामसभेत दिला. यावेळी त्यांनी जलस्रोत व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांना फैलावर घेतले.

कोरगावात गेल्या दोन महिन्यापासून नळ कोरडे पडल्याने गेल्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत संतप्त ग्रामस्थांनी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना कोरगावात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार आज पंचायतीच्या मिनी सभागृहात घेण्यात आलेल्या खास ग्रामसभेत ग्रामस्थांनी मोठय़ा संख्येने हजरी लावली होती.

चांदेल प्रकल्प सुरु झाल्यापासून आजपर्यंत कोरगावात कधीच पाण्याचा तुटवडा जाणवला नाही. पण पर्यटन हंगाम तेजीत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यातच येथे सुरळीत येणारे पाणी अचानक कुठे गायब झाले असा खरमरीत प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. तसेच मागील पाणीप्रश्नावर आवाज उठविल्यानंतर ताबडतोब दुसऱया दिवसापासून नळांना पाणी आले होते. पाणी न येणाऱया जलवाहिनीतून आवाज केल्यावर पाणी आणण्याचा चमत्कार सार्वजनिक बांधकाम खाते करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

त्या अधिकाऱयाची उचबांगडी करावी

पेडणे खात्याचे अधिकारी पाणी समुद्रकिनारी भागात वळवत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला. तसेच काही पाण्याच्या चेंबरमधील वॉल्व फिरवण्याचे प्रकार खुद्द पेडणे साबांखातील एका अधिकाऱयाकडून होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यापुढे असे प्रकार घडल्यास सदर अधिकाऱयाची उचबांगडी करावी, अशी मागणी करण्यात आली.

दोन टाक्या विनावापर पडून

कोरगावसाठी 1.20 एमएलडी क्षमतेच्या दोन टाक्या अनेक वर्षापासून विनावापर पडून आहेत. तेथे बुस्टर पंप बसवून पाणी भरण्यासाठी तातडीने काम सुरु करावे, असा, आदेश मंत्री आजगावकर यांनी अभियंता वाल्सन यांना दिला. तसेच माईनवाडा येथील वस्तीत नळजोडणी असली तरी त्यांना आजवर पाणी मिळत नसल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर मंत्र्यांनी त्यावर तोडगा काढण्याची सूचना केली.

रोडमॅप ग्रामस्थांसमोर मांडावा

तुये ते कोरगावपर्यंत जलस्रोत खात्याने टाकलेल्या जलवाहिनीमुळे रस्ते आणि संरक्षक भिंतीची तोडफोड झाली आहे. सुकाळवाडापर्यंत जलवाहिनी टाकली आहे. तिचे तिथेच काम बंद करावे व इथपर्यंत रस्ता करावा. रस्ताशेजारील लोकांची कामे करताना तोडलेली नळजोडणी दुरूस्त करून द्यावी, तसेच जलस्रोत खात्याचा हा प्रकल्पा नेमका काय आहे आणि त्याचा लोकांना कोणत्या पद्धतीने फायदा होणार आहे याचा रोडमॅप ग्रामस्थांसमोर मांडावा, असे आदेश आजगावकर यांनी दिला.

मांद्रे मतदारसंघाचा पाणीप्रश्न सुटेल

चांदेल पाणी प्रकल्प हा मुख्यत्वे पेडणे मतदारसंघाची तहान भागवण्यासाठी उभारलेला आहे. तुये येथे नवीन 80 एमएलडी क्षमतेचे दोन पाणी प्रकल्प येत आहेत. तेव्हा मांद्रे मतदारसंघाचा पाणीप्रश्न सुटेल. भविष्याचा विचार करून कोरगावातून जाणाऱया नवीन जलवाहिनीमुळे येथे शेती, बागायती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत असेल तर या प्रकल्पाला विरोध न करता त्यावर ग्रामस्थांनी सकारात्मक विचार करावा, अशी मंत्री आजगावकर यांनी सूचना केली.

पाणी व वीज विभागाकडून पेडणेत लोकांना मीटर बॉक्स उपलब्ध नसल्याने विकत घेण्याची सक्ती केली जाते, असे ग्रामस्थ उमेश तळवणेकर यांनी निदर्शनास आणले. त्यावर हा प्रकार आढळून आल्यास आपण त्या खात्याला विचारतो, अन्यथा स्वखर्चाने त्यांना मीटर देतो, असे मंत्र्यानी सांगितले.

जलवाहिनी भविष्यात लाभदायक ठरणार : शेटये

कनिष्ठ अभियंता उल्हास शेटये यांनी जलस्रोत खात्याची जलवाहिनी ही लोकांना भविष्यात लाभदायक ठरणार असे यावेळी सांगितले. विनाप्रक्रिया पाणी तुये, कोरगाव आणि पालये गावासाठी पुरवण्याचे नियोजन असून ही जलवाहिनी तेरेखोल येथे जाणार नाही, असे सांगितले. तुये पठारावर पाणी साठवून सखल भागातील जमीन ओलिताखाली आणणे एवढाच हा उद्देश आहे, असे ते म्हणाले.

तिलारीचे कार्यकारी अधिकारी प्रसाद नायर यांनी मंत्री आजगावकर यांच्या सूचनेप्रमाणे काम स्थगित ठेवण्याचे आश्वासन दिले. 20 फेब्रुवारीपर्यंत येथील जलवाहिनीची पूर्ण चाचणी करून सर्व चेंबर्स बांधल्यानंतर रस्ता बांधकाम करण्यासाठी आपण हे काम सर्वाजनिक बांधकाम खात्याकडे सुपूर्द करू, असे सांगितले.

या संदर्भात आढावा घेण्यासाठी सर्वाजनिक बांधकाम खाते आणि जलस्रोत खात्याचे अधिकारी, पदाधिकारी आणि निवड ग्रामस्थांनी बैठक पेडणे येथे बुधवार दि. 7 रोजी संध्याकाळी बोलवावी, असे आजगावकरानी उपस्थित अधिकाऱयांना कळविले.