|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्याच्या मार्गक्रमणाच्या दिशेवर चिंतन होण्याची गरज

गोव्याच्या मार्गक्रमणाच्या दिशेवर चिंतन होण्याची गरज 

वार्ताहर/ केपे

गोवा आज कोणत्या दिशेने चालला आहे त्यावर आता चिंतन झाले नाही, तर येणाऱया काळात गोवा गोमंतकीयांसाठी राहणार नाही, अशी खंत माजी मंत्री व महामराठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप यांनी व्यक्त केली. ते गेवा मराठी अकादमीतर्फे केपे महाविद्यालयात आयोजित दुसऱया महामराठी संमेलनाच्या समारोप सोहळय़ात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, कार्याध्यक्ष अशोक माणगूतकर, वल्लभ केळकर आदी हजर होते. आपला देश व राज्य सुरक्षित राहायचे असेल, तर युवावर्गाकडे ही जबाबदारी द्यायला हवी. अकादमीतर्फे या संमेलनाची जबाबदारी आमच्यावर सोपविण्यात आली. मात्र काही दिवसांतच हे संमेलन भरवून यशस्वी करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. हे संमेलन यशस्वी करण्याकरिता दक्षिण गोव्यातील सहा तालुक्यांतील शिक्षक, विद्यार्थी, अन्य मराठीप्रेमी, सरकारी खाती अशा सर्वांचे सहकार्य लाभले आहे, असे वेळीप यांनी पुढे बोलताना सांगितले.

युवावर्गाचा सहभाग हे वैशिष्टय़ : सामंत

युवावर्गाचा सहभाग हे या संमेलनाचे वैशिष्टय़ आहे. बदलत्या काळात युवक-युवतींना साहित्याकडे वळविण्याचा तसेच त्यांना चिंतन करायला लावण्याचा हा कार्यक्रम आहे. आजवर झालेली इतर संमेलने आणि या संमेलनात वेगळेपण आहे. काळाची पावले ओळखून आजच्या तरुणाईला साहित्यावर प्रेम करायला लावणारे हे संमेलन आहे, असे अनिल सामंत आपल्या भाषणात म्हणाले.

या संमेलनाची तयारी अवघ्या काही दिवसांत करण्यात आली. हे संमेलन यशस्वी झाले आहे. ते करायला हवे म्हणून आयोजित केलेले नाही, तर मराठीचे बाहू बळकट करण्यासाठी भरविण्यात आलेले आहे. त्याचदृष्टीने अनेक विद्यार्थ्यांना आयोजनाची जबाबदारी देण्यात आली होती. कारण येणाऱया काळात हेच विद्यार्थी मुख्य कार्यक्रमात भाषणे करताना दिसतील. तेव्हाच कार्यक्रम, संमेलने यशस्वी होतील, असे वल्लभ केळकर म्हणाले. गोवा मराठी अकादमीची दारे सर्वांसाठी खुली असल्याचे त्यांनी सांगितले.

शनिवारी सुरू झालेल्या या संमेलनाच्या दुसऱया दिवशी रविवारी सकाळी ‘उमलत्या कविता’ हे नवोदित कवींचे संमेलन झाले. त्यानंतर ‘सवेष नाटय़संवाद’ हा बालकलाकारांचा कार्यक्रम तसेच महिलांचा ‘अभिरूप न्यायालय’ हा कार्यक्रम रंगला. मग ‘मराठीतूनच प्राथमिक शिक्षण का ?’ या विषयावर परिसंवाद होऊन त्यात प्राथमिक शिक्षकांचा सहभाग राहिला. त्याशिवाय ‘मराठी वाङमयाच्या मुख्य धारेत गोमंतकीयांचे योगदान’ या विषयावर डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी माहिती दिली. संमेलनाच्या शेवटी ‘गोमंतकाची लोककला’ हा कार्यक्रम होऊन त्यात गोमंतकीय लोककलाकारांनी आपली कला सादर केली.