|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावच्या वृद्ध दांपत्याची गोकाक येथे आत्महत्या

बेळगावच्या वृद्ध दांपत्याची गोकाक येथे आत्महत्या 

प्रतिनिधी/ बेळगाव

गोकाक धबधब्यावरून उडी टाकून काकतीवेस रोड-बेळगाव येथील एका वृद्ध दांपत्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सुरेश सहदेव औंधकर (वय 66), सुमित्रा सुरेश औंधकर (वय 60) अशी त्या दुर्दैवी दांपत्याची नावे आहेत. सुरेश हे मूळचे कोल्हापूर जिल्हय़ातील रुकडीचे असून सध्या काकतीवेस रोड-बेळगाव येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, चार भाऊ असा परिवार आहे.

रुकडी येथे अंत्यसंस्कार होणार

सुरेश हे येथील नामदेव देवकी शिंपी समाजाचे प्रमुख कार्यकर्ते होते. रविवारी सकाळी आत्महत्येचा हा प्रकार उघडकीस आला. मात्र, नेमके कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती समजताच समाजाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी गोकाककडे धाव घेतली. रविवारी रात्री उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मृतदेह रुकडीला पाठविण्यात आले. सोमवारी सकाळी 11 वाजता रुकडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

शनिवारी दुपारी सुरेश व सुमित्रा हे दोघे घराबाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यांचे मोबाईलही घरीच होते. त्यामुळे मुलीने खडेबाजार पोलिसांना माहिती देऊन या वृद्ध दांपत्याचा शोध घेण्याची विनंती केली होती. सर्वत्र शोध सुरू असतानाच रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या दांपत्याने गोकाक धबधब्यावर आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. गोकाक येथील सुरेश यांचे नातेवाईक भालचंद पतंगे यांनी दोन्ही मृतदेहांची ओळख पटविली.

एकाच ताटात शेवटचे जेवण

सुरेश हे खडेबाजार येथील एका तयार कपडय़ांच्या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करित होते. शुक्रवारी हे दांपत्य गडहिंग्लज जवळील काळभैरीचे दर्शन घेवून बेळगावला परतले होते. शनिवारी दुपारी 4 च्या सुमारास रेल्वेने ते गोकाक धबधब्याला गेले. धबधब्यावर बसून एकाच ताटात शेवटचे जेवण घेऊन हातात हात घालून त्यांनी आपले जीवन संपविले.

काळभैरीच्या प्रसादाच्या पिशवीत घरची चावी ठेवून त्यांनी आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस येताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी  दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. सुरेश हे गोकाक येथील सूतगिरणीत काम करीत होते. 11 वर्षांपूर्वी नोकरीचा राजीनामा देवून ते बेळगावला आले होते. समाजाच्या कार्यात नेहमी ते आघाडीवर असायचे. गेल्या रविवारी झालेल्या नामदेव देवकी समाजाच्या वधू-वर मेळाव्यातही त्यांचा पुढाकार होता. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.