|Thursday, June 27, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पहिल्या जागतिक विज्ञानकथेची दोनशे वर्षे

पहिल्या जागतिक विज्ञानकथेची दोनशे वर्षे 

इ. स. 1818 मध्ये ‘फ्रँकेन्स्टाईन ऑर मॉडर्न डे प्रोमेथिअस’ ही कादंबरी बाजारात आली तेव्हा तिच्यावर लेखकाचं नाव नव्हतं. त्या कादंबरीची दुसरी आवृत्ती सहा महिन्यांनी बाजारात आली त्यावेळी त्या शीर्षकाखाली मेरी शेली हे नाव होतं. त्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत ही कादंबरी मेरी शेलीनं स्वप्रज्ञेनं लिहिली असल्याचा निर्वाळा दिला होता. ते साहजिकच होतं. कारण मेरी शेली ही पर्सी बिस्सी शेलीची पत्नी होती. पर्सी हा साहित्यिक म्हणून प्रसिद्ध होता. ही कादंबरी कशी लिहिली गेली, हे बरेचदा लिहून झालंय. त्याची पुनरावृत्ती मी इथं करीत नाही. आपली कादंबरी दोनशे वर्षे टिकेल. तिच्या अनेक सटीक आणि सटीप आवृत्त्या निघतील. ज्या व्यक्तीरेखांवर सर्वाधिक चित्रपट निघाले आहेत अशा पहिल्या तीन व्यक्तीरेखांमध्ये तिचा समावेश असेल, (ड्रकुला आणि शेरलॉक होम्स या इतर दोन व्यक्तीरेखा) एवढंच नव्हे तर तिला आद्य विज्ञान वाखाणलं जाईल याची मेरी शेलीला कल्पनाही आली नसेल. त्या कादंबरीच्या प्रकाशनाला इ. स. 2018 मध्ये दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे हे वर्ष पाश्चात्य देशांमध्ये विज्ञान साहित्याची दोनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरं केलं जातंय.

आपल्याकडेही हळूहळू विज्ञान कथा रुजत चालली आहे. दोन वर्षांपूर्वी मराठीतील अनुवादित नसलेल्या आणि कथा या स्वरूपात असलेल्या पहिल्या विज्ञान कथेला शंभर वर्षे पूर्ण झाली. असं म्हणायचं कारण त्या आधी ज्यूल्सव्हर्नच्या कादंबरीचा ‘मेन ऑन द मून’चा अनुवाद ‘चंद्रलोकची सफर’ या नावानं इ. स. 1900 ते 1906पर्यंत जमेल तसा आणि जागा मिळेल तसा केरळ कोकीळच्या अंकात प्रसिद्ध होत होता, पण तो सलग असा प्रसिद्ध झाला नव्हताच पण तो पुस्तक रूपानेही प्रसिद्ध झाला नव्हता. हे थोडं विषयावर झालं. पण हे सांगायचं कारण जागतिक विज्ञान साहित्यातील म्हणजे सायन्स फिक्शनमधील पहिली कलाकृती प्रसिद्ध झाल्यानंतर जवळ जवळ शंभर वर्षांनंतर मराठीत खऱया अर्थानं विज्ञान साहित्य अवतरलं, हे लक्षात यावं म्हणून हे सांगितलं एवढंच.

मेरी शेलीनं आणखीही एक विज्ञान साहित्यकृती लिहिली. ‘द लास्ट मॅन’ हे त्या साहित्यकृतीचं नाव. मेरी शेलीच्या मृत्यूनंतर या कादंबऱयांकडं का कोण जाणं जगाचं दुर्लक्ष झाले. ‘फ्रँकेन्स्टाईन’ लिहिताना मेरीचं वय अजून वीसही नव्हतं. वयाच्या 18-19 व्या वषी ही अद्भूत विज्ञान कादंबरी तिनं का लिहिली याचं विश्लेषण करणारं लेखन तिच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनंतर होऊ लागलं होतं. तोपर्यंत ‘फ्रँकेन्स्टाईन’ हे ‘दुष्ट आणि विकृत बुद्धीचा नरराक्षक’ अशा व्यक्तींसाठी विशेषण म्हणून वापरण्यात येऊ लागलं होतं, इतकी फ्रँकेन्स्टाईनची बदनामी झालेली होती. ‘फ्रँकेन्स्टाईन ऑर मॉडर्न प्रामेथिअस’ या कादंबरीची भीती कथेत समावेश होऊ लागला होता. याला सर्वस्वी हॉलिवूड जबाबदार होतं. प्रत्यक्षात एका कारुण्यपूर्ण कथेच्या शेवटच्या प्रकरणावर भर देऊन चित्रपट निर्मिती करून गल्ला भरणं, हे ध्येय ठेवलेल्या निर्मात्यांनी या कादंबरीतल्या विज्ञानाच्या भागाकडं दुर्लक्ष करून फक्त ‘भीती एके भीती’ अशा प्रकारे फ्रँकेन्स्टाइनला जगापुढं आणला. बोरीस कारलॉफ हा नट त्याच्या इतर भूमिका मागे पडून ‘कायमस्वरूपी’ फ्रँकेन्स्टाईन म्हणूनच अमर झाला.

मेरी शेली ही मुळात मेरी गॉडविन-तिचा बाप सरदार, आई स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रवर्तकांपैकी एक. मेरीला जन्म देताना मेरी वुल्स्टोनआफ्टरचा मृत्यू झाला तेव्हा तिचंच नाव या नवजात मुलीला ठेवण्यात आलं. वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यानंतर खरंतर मेरीला कोणताच जाच सहन करावा लागला नव्हता पण तिच्यात आणि तिच्या सावत्र भावंडात साहजिकच अंतर पडलं होतं. त्यामुळं मेरी एकलकोंडी बनली. एखाद्या झाडाखाली बसून स्वतःच्या विचार विश्वात रममाण होणं, हा तिचा विरंगुळा बनला होता. मेरी चौदा वर्षांची असताना तिच्या आयुष्यात पर्सी बिशी शेली हा त्या काळातील साहित्यक्षेत्र गाजविणारा, विचारानं बंडखोर कवी आला. शेलीचं लग्न झालेलं होतं. त्याला दोन मुलं होती तरीही त्याचं आणि मेरीचं जुळलं. मेरी सोळा वर्षांची असताना ती दोघं पळून युरोपात गेली, आणि लॉर्ड बायरनच्या स्वित्झर्लंडमधील राजप्रासादात राहू लागली. 1817-1818 चा हिवाळा अतिशय तीव्र होता. तेव्हा घरातल्या आगोटीभोवती सुरापान करीत जर्मन भूतकथांचं वाचन हा एक करमणुकीचा मार्ग त्यांनी अवलंबला. तेव्हा नुसत्या कथा वाचनापेक्षा त्या लिहायला हव्यात, असं ठरविण्यात आलं.

व्हिला डिओडाटी या जिनिव्हा सरोवराच्या काठच्या प्रासादात, पर्सी, मेरी, जॉन पॉलिडेरी आणि स्वतः बायरन यांनी प्रत्येकी एक भूतकथा लिहावी, त्यावर चौघांचं एकमतही झालं. यातूनच मेरीच्या फ्रँकेन्स्टाईनचा जन्म झाला. तिला एक अजरामर कथा लिहायची इच्छा होती. संपूर्ण मानव जातीची व्यथा आपल्या कथेत उतरायला हवी, असं तिला वाटत होतं. ही व्यथा ‘जीवनाच्या कोडय़ांची होती. एखाद्या जिवंत वस्तूत जीव कोण आणि कसा ओततं, हे कोडं त्यावेळी बऱयाच तत्वज्ञांना सतावत होतं. एक दिवस संध्याकाळी बायरन आणि शेली, हे याच प्रश्नाची चर्चा करीत होते. त्यांच्या चर्चेचा विषय इरॅस्मस डार्विन या वैद्यकशास्त्रज्ञ-तत्वज्ञ आणि कवी, याचे जीवनासंबंधीचे चाकोरी बाहेरचे प्रयोग हा होता. (डॉ. इरॅस्मस डार्विन म्हणजे चार्ल्स डार्विनचे आजोबा) या डॉ. डार्विनचे प्रयोग जगावेगळे तर होतेच पण त्याने काही निर्जीव शेवयासारख्या पदार्थात जीव भरल्याची अफवा तेव्हा सर्वत्र पसरली होती. त्याच सुमारास विद्युत प्रवाह निर्माण करण्याचं तंत्र अवतरलं होतं. डॉ. डार्विननी हेच तंत्र वापरून शेवयामध्ये जीव पुंकल्याची कुजबूज होती.

याच काळात लुईमी गॅहव्हाना यांनी विजेच्या धक्क्मयामुळे मृत बेडकाचे पाय हालचाल करतात, हे निरीक्षण जाहीर केलं होतं. त्यामुळं बऱयाच तत्वज्ञांनी मानवासहित सर्व प्राणी ही नैसर्गिक यंत्रे असून ती विद्युत प्रवाहाच्या साहाय्यानं चालवली जात असावीत असा एक विचार प्रवाह पुढे आणला. हे जर खरं मानलं तर विद्युत प्रवाहाचा योग्यप्रकारे वापर केला तर मृत व्यक्तींना जिवंत करणं शक्मय होईल, अशी कल्पना करण्यात काहीच वावगं नव्हतं, मेरीच्या कल्पनाशक्तीनं हा विचार आणखी थोडा पुढे ताणला. वेगवेगळय़ा प्रेतांचे तुकडे एकत्र शिवून त्यात विद्युत प्रवाह सोडून त्या एकत्रित केलेल्या शरीरात जीव फुंकला.

ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर काही वर्षांनी मेरीनं हा विचार डोक्मयात आल्यानंतर काय घडलं, ते लिहून ठेवलंय. ती लिहिते-‘जेव्हा मी अंथरुणावर पडले आणि उशीवर डोकं टेकलं तेव्हा मला झोप येईना. मी विचारही करीत नव्हते. माझी कल्पनाशक्ती स्वैर सुटली होती. त्या अनिर्बंध कल्पनाशक्तीनं माझा ताबा घेतला होता. तीच मला मार्गदर्शन करीत होती. माझ्या मनश्चक्षूंपुढे अत्यंत स्पष्ट, नेहमीपेक्षा जास्त बारकावे दिसत असलेल्या प्रतिमा नाचत होत्या. बंदी असलेल्या कृतींचा तो अभ्यासक त्यानंच एकत्रित केलेल्या त्या मानवसदृश आकृतीजवळ गुडघे टेकून बसला होता. मग त्यानं एक अत्यंत शक्तिशाली यंत्रणा सुरू केली, त्या बरोबर ती मानवसदृश आकृती झटके देत शरीर हलवू लागली. तिच्यात जीव असावा, असं वाटू लागलं. किती भेदरवणारी घटना होती ती. सृष्टी निर्मात्याच्या जीवनदायी शक्तीला ते थेट आव्हानच होतं. कुठल्याही मानवी कृतीनं आजपर्यंत असं आव्हान जगन्नियंत्याला दिलेलं नव्हतं. या कृतीचा कर्ता त्याच्या या यशानं नक्कीच घाबरून गेला होता. तो थरथरत त्याच्या त्या अत्यंत घृणास्पद कृतीपासून घाबरून दूर झाला.’

आज जननिक नियंत्रणाचे जे प्रयोग अनिर्बंधपणे सुरू आहेत. माणसाला अमरत्वाकडं न्यायची विविध अवयवारोपणं चालू आहेत. त्याची तर ही पूर्वसूचना नसेल. त्यात दडलेले धोके दाखवायचा प्रयत्न करणारी ही कादंबरी जरी बराच काळ भीती कथा म्हणून गाजली तरी दुसऱया महायुद्धानंतर जेव्हा विज्ञान साहित्याचा पद्धतशीर अभ्यास सुरू झाला तेव्हा त्या कादंबरीला पहिली विज्ञान साहित्यकृती असं अभ्यासक म्हणून लागले.