|Sunday, August 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भली ले गोविंदा युक्ती केली

भली ले गोविंदा युक्ती केली 

थोडय़ाच दिवसात रांगणे संपवून बलराम व कृष्ण सहजपणे गोकुळात हिंडू फिरू लागले. लवकरच त्यांनी अनेक सवंगडी गोळा केले. कृष्ण, बलरामाला घरात भरपूर दही दूध खायला प्यायला मिळे. पण सवंगडय़ांना घरात केवळ ताक प्यायला मिळे. तुकाराम महाराज वर्णन करतात –

गौळियांची ताकपिरे । काय पोरे चांगली ।।

गोकुळचे सगळे दुभते मथुरेच्या बाजारात जाई. मग करायचे तरी काय? देवाने काय केले ते नामदेवराय  वर्णन करतात –

मिळवूनि सौंगडे सांगती तयासी । चला गोरसासी देतों तुम्हां ।। गेली असे एक गौळण जळाळा । सांगे तो गोपाळा तेथें जाऊं ।। न पुरेची हात दूध शिंक्मयावरी । करावें मुरारी कैसें येथें ।। पाटावरी पाट रची वनमाळी । पाडीतसे डुळी मोहोरीनें ।। बडवोनी टिरी नाचतसे पेंदा। भली ले गोविंदा युक्ती केली ।। उगला ले बेत्या कलूं नको गलबला । थांबाला ले गोळा लोनियाचा ।। कोणी पिती दूध कोणी खाती दहीं । आली लवलाही गौळण ते।। अहर्निशीं धराया पहातें मी तुज । जासी कैसा आज चोरटीया ।। मुखींहूनि पय टाकी तिच्या डोळां । नामा म्हणे पळा सांगतसे ।।

बलराम व कृष्ण आपल्या सवंगडय़ांना बोलावून म्हणाले-आम्ही तुम्हाला गाईचे दूध देतो. एक गौळण पाण्यासाठी यमुना नदीकडे गेली आहे. आपण तिच्या घरी जाऊ. सर्वजण तिच्या घरी गेल्यावर सवंगडी म्हणाले-हे कान्हा! दूध तर शिंक्मयावर आहे. त्याच्यापर्यंत हात पुरत नाहींत. यासाठी काय युक्ती करावी? कृष्णाने एक युक्ती केली. पाटावर पाट रचले आणि त्यावर उभे राहून हातातील बासरीने दुधाच्या मडक्मयाला भोक पाडले. हे पाहून पेंद्या आनंदाने टिरी बडवून नाचत म्हणाला-हे गोविंदा, फार चांगली युक्ती केलीस. हे गडय़ांनो, गडबड करू नका. हा लोण्याचा गोळा सांभाळा. अशाप्रकारे कोणी दूध पिऊ लागले व कोणी दही खाऊ लागले. एवढय़ात पाण्याला गेलेली गौळण घरी आली आणि कृष्णाला उद्देशून म्हणाली – मी रोज तुला धरण्याचा प्रयत्न करीत आहे. हे चोरा, आज कसा सुटशील? त्यावेळी कृष्णाने तिच्या डोळय़ात दूधाची चूळ टाकली आणि तो सवंगडय़ांना म्हणाला-आता तुम्ही येथून पळा.

बालकाच्या बोबडय़ा बोलांचे आकर्षण कुणाला असत नाही. संतांनाही या बोबडय़ा बोलातील निरागसता आणि गंमत आकर्षित करते. नामदेवरायांच्या या अभंगात पेंद्या बोबडे बोलतो. ज्ञानेश्वर माउलींनी एका अभंगात वर्णन केलेली ही बोबडी गौळण भलतीच गोड आहे-

काय सांगू तुते बाई  काय सांगू तुते ।।

जात होते यमुने पाणिया  वातत भेतला सांवला ।

दोईवल तोपी मयुल पुछाची  खांद्यावली कांबला ।।

तेणे माझी केली तवाली  मग मी तेथून पलाली ।

पलतां पलतां घसलून पलली  दोईची घागल फुतली ।।

माझे घुलगे फुतले  मग मी ललत बथले ।

तिकून आले शालंगपानी मला पोताशी धलिले ।।

मला पोताशी धलिले  माझे समाधान केले ।

निवृत्तीचे कृपे सुख हे ज्ञानदेवा लाधले ।।

– ऍड. देवदत्त परुळेकर