|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मासे मृत्यू : ‘प्रदूषण’ची महापालिकेला नोटीस

मासे मृत्यू : ‘प्रदूषण’ची महापालिकेला नोटीस 

 

प्रतिनिधी/ सांगली

सांगलीची जीवनवाहिनी असणाऱया कृष्णा नदीतील रविवारी झालेल्या मासे मृत्युमुखी प्रकरणी उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका प्रशासनाला नोटीस बजावली असून या प्रकरणी तातडीने खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी मनसेकडून लवकरच मनपा अधिकाऱयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती, माजी आम. नितीन शिंदे यांनी दिली.

रविवारी कृष्णा नदीतील मासे मोठय़ा प्रमाणात मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. यावेळी काही नागरिक हे मासे गोळा करुन विकण्याचाही प्रयत्न करत असल्याचे काही समाजसेवी संस्थांच्या निदर्शनास आले. याबाबत या समाजसेवकांनी तात्काळ दखल घेत हे मासे विक्री करणाऱया नागरिकांना रोखत नदीतील मृत मासे पाण्याबाहेर काढले. नदीतील कमी झालेले पाणी व शेरीनाल्याचे मोठया प्रमाणात मिसळणारे दूषित पाणी यामुळे नदीचे प्रदूषण होऊन मासे मृत झाल्याचे आढळून आले. जलप्रदूषणामुळे जलचरांबरोबरच नागरिकांच्याही आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याने उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी लिंबाजी भड, क्षेत्र अधिकारी वर्षा कदम, उत्तम माने यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या पाहणीत त्यांना शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी महापालिकेला रविवारी नोटीस जारी करत शेरीनाल्याचे पाणी बंद करावे. त्याचबरोबर धुळगाव योजना तात्काळ सुरु करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदूषण मंडळाने महापालिकेला जलप्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1974 व पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कायन्वद्याये नोटीस जारी केल्याची माहिती उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी लिंबाजी भड यांनी दिली.

यापूर्वीही सन 2015 मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेबाबत उदासिन असणाऱया महापालिका प्रशासनाविरोधात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच शेरीनाल्यामुळे कृष्णा नदीचे होणारे प्रदूषण याबाबत महापालिकेस सातत्याने नोटीस बजावली होती. मात्र मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शेरीनाल्याबाबत तात्काळ उपाययोजना करुन धूळगाव योजना कार्यान्वीत करण्याचे आदेश देण्यात आल्याचे भड यांनी सांगितले. या प्रकरणामुळे सांगलीकरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने तसेच मासे मृत्युमुखी पडल्याप्रकरणी मनपा अधिकाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितले.

Related posts: