|Saturday, April 20, 2019
You are here: Home » उद्योग » पुराण प्रसिद्ध चोर

पुराण प्रसिद्ध चोर 

ज्ञानेश्वर माउलींनी वर्णन केलेली बोबडी गौळण जे सांगते त्याचा भावार्थ असा – बाई! तुला मी काय घडले ते सांगू तरी काय आणि कसे गं? मी यमुना नदीवर पाण्याला जात होते, तर वाटेत मला सावळा भेटला. त्याच्या डोक्मयावर मोरपिसांची टोपी आणि खांद्यावर कांबळे होते. त्याने माझी थट्टा केली तेव्हा मी तेथून पळाले. पळता पळता पाय घसरून पडले. माझ्या डोक्मयावरची घागर फुटली. माझे गुडघे फुटले. त्यामुळे मी तेथेच रडत बसले, तेव्हा शारंगपाणी श्रीकृष्ण आले. त्यांनी मला पोटाशी धरले. मला पोटाशी धरून त्यांनी माझे समाधान केले, असे ही चिमुकली गौळण सांगते. तिच्यासारखे आत्मसुख निवृत्तीनाथांच्या कृपेने आपल्याला लाभले असे ज्ञानेश्वर माउली अभंगाच्या शेवटी सांगतात. कृष्णाने केलेल्या अनेक लीलांमधील एक सुप्रसिद्ध लीला म्हणजे त्याने केलेली चोरी. सर्व संतांनी ह्या लीलेचे वर्णन केले आहे. नामदेवराय तर एका अभंगात म्हणतात –

ऐसा पुराण प्रसिद्ध चोर ।केशव नाम्याचा दातार ।।

या चोरीच्या लीलेचे पारमार्थिक रहस्य संत एकनाथ महाराजांनी एका अभंगात उलगडून दाखवले आहे. तो अभंग असा-

आवरी आवरी आपुला हरी ।दुर्बळाची केली चोरी । घरा जावयाची उरी ।कृष्णे  ठेविली नाही । गौळणी उतावेळी ।आली यशोदे जवळी । आवरी आपुला वनमाळी ।प्रळय आम्हां दिधला ।।कवाड भ्रांतीचे उघडीले । कुलूप मायेचे मोडिले ।शिंके अविद्येचे तोडिले ।बाई तुझिया कृष्णे ।।

होती क्रोधाची अर्गळा।हळूची काढीलीसे बळा ।होती अज्ञानाची खिळा तिही निर्मूळ केली ।।डेराफोडीलादंभाचा ।त्रिगुण तिवईस ठाव कैसा ।

प्रपंच सडा हा ताकाचा ।केला तुझिया कृष्णे ।। अहंकाराचा होता ठोंबा ।उपडिला घुसळखांबा ।तोहि टाकिला स्वयंभा ।बाई तुझिया कृष्णे ।।संचित हे शिळे लोणी ।याची केली धूळधाणी ।संकल्प विकल्प दुधाणी ।तीही फोडिली कृष्णे ।।प्रारब्ध हे शिळे दही ।माझे खादले गे बाई ।क्रियमाण दुध साई ।तीही मुखी वोतिली ।।द्वेष रांजण सगळे ।स्पर्शे होति हात काळे ।होते कामाचे ते पाळे ।तेहि फोडिले कृष्णे ।।सुचित दुश्चित घृत घागरी ।लोभे भरल्या होत्या घरी ।त्याही टाकील्या बाहेरी।तुझीया कृष्णे ।।कल्पनेची उतरंडी ।याची केली फोडाफोडी ।होती आयुष्याची दुरडी ।तेही मोडिली कृष्णे ।। पोरे रे अचपळ आमुची ।संगती धरली या कृष्णाची ।मिळणी मिळाली तयांची ।संसाराची शुद्ध नाही ।।ऐशी वार्ता श्रवणी पडे ।मग मी धावोनि आले पुढे ।होते द्वैताचे लुगडे ।तेहि फिटोनि गेले ।।आपआपणा विसरले ।कृष्णस्वरूपी मिळाले । एका जनार्दनी केले ।बाई नवल चोज ।।

गौळणी यशोदेकडे आपले गाऱहाणे सांगतात-हे यशोदे! तू आपल्या श्रीहरीला आवर कारण तुझ्या या कृष्णाने आम्हा दुबळय़ांच्या अज्ञानाची चोरी केली म्हणून देह तादात्म्यरुपी घराला जावयाची सोय काही शिल्लक ठेवली नाही. भगवत् स्वरुपाविषयी उताविळ असलेली गौळण यशोदेजवळ आली आणि म्हणाली, वनमाला धारण केलेल्या तुझ्या कृष्णाला आवर, कारण याने आमच्या देहाचाही नाश केला.

Related posts: