|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताची हाँगकाँगवर 3-2 ने मात

भारताची हाँगकाँगवर 3-2 ने मात 

आशियाई सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप :सिंधूचा कर्णधारपदाला साजेसा खेळ, पुरुषांतही फिलिपीन्सचा 5-0 ने धुव्वा

वृत्तसंस्था/ अलोन सेतार (मलेशिया)

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने केलेल्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने अटीतटीच्या लढतीत हाँगकाँगवर 3-2 असा विजय मिळवला. मलेशियातील अलोन सेतार शहरात सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत महिला गटातील भारताचा हा पहिला विजय ठरला. सायना नेहवालने अंतिम क्षणी या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर सिंधूकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. श्रीकांतच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाने फिलिपीन्सचा 5-0 असा धुव्वा उडवला.

मंगळवारपासून प्रारंभ झालेल्या या स्पर्धेतील महिलांच्या पहिल्या एकेरी सामन्यात सिंधूने हाँगकाँगच्या यिप प्युई यिनवर 21-12, 21-18 असा विजय मिळवला. यानंतर, दुहेरीतील सामन्यात अश्विनी पोनप्पा व प्राजक्ता सावंत जोडीला नू विंग व येऊंन टिंग या जोडीकडून 22-20, 20-22, 10-21 असा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर, भारताच्या कृष्णाप्रियाचे आव्हानही चेऊंग यिंगने 19-21, 21-18, 20-22 असे परतवून लावले. या पराभवामुळे चांगल्या सुरुवातीनंतरही भारत 1-2 असा पिछाडीवर पडला होता.

कर्णधार सिंधूने दुहेरीतील सामन्यात एन.सिक्की रेड्डीसोबत कोर्टवर उतरत हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धी जोडीला 21-15, 15-21, 21-14 असे पराभूत करत 2-2 अशी बरोबरी साधली. तिसऱया एकेरी सामन्यात ऋत्विका गड्डेने येऊंग यीला 16-21, 21-16, 21-13 असे नमवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता, भारताची पुढील लढत गुरुवारी जपानविरुद्ध होईल.

पुरुष गटात फिलिपीन्सचा 5-0 ने धुव्वा

श्रीकांतच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने फिलिपीन्सला 5-0 असे एकतर्फी पराभूत केले. पहिल्या एकेरीच्या लढतीत श्रीकांतने पेड्रोसा रोसला 21-11, 21-12 असे नमवत 1-0 ने आघाडी घेतली. यानंतर, पुरुष दुहेरीच्या लढतीत मनु अत्री-बी. सुमित रेड्डी जोडीने प्रतिस्पर्धी संघाच्या अँटनी-फिलिप जोडीचा 21-15, 21-13 असा पराभव केला. तसेच एकेरीतील दुसऱया सामन्यात युवा साई प्रणिथने शानदार खेळ साकारत फिलिपीन्सच्या ऑर्थर सॅल्वेडोचा 21-6, 21-10 असा धुव्वा उडवत 3-0 अशी आघाडी मिळवली होती. यानंतर झालेल्या दुहेरीच्या दुसऱया सामन्यात एम.आर. अर्जुन व श्लोक रामचंद्रन जोडीने पीटर अल्वेडा-एल्वेनि मॅरोडा जोडीला 21-18, 21-17 असे तर एकेरीच्या तिसऱया सामन्यात समीर वर्माने प्रतिस्पर्धी संघाच्या लांज झाल्फ्राचा 21-15, 21-12 असे नमवत भारताला 5-0 असा एकतर्फी विजय मिळवून दिला. भारतीय संघाची पुढील लढत इंडोनेशियाशी होईल.