|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘नक्षत्र-महोत्सव 2018’चे उद्या शुभारंभ

‘नक्षत्र-महोत्सव 2018’चे उद्या शुभारंभ 

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हावासिय वाट पहात असलेल्या नक्षत्र-महोत्सव 2018 चे संपूर्ण नियोजन झाले असून, उद्या 8 रोजी सायंकाळी 5 वाजता, सातारच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्वेता सिंघल यांच्या शुभहस्ते, सातारच्या प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख, नक्षत्रच्या संस्थापिका अध्यक्षा छत्रपती दमयंतीराजे भोसले यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती नक्षत्रच्या उपाध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका स्मिता घोडके यांनी दिली.

   नक्षत्र महोत्सवाच्या मांडव उभारणीचा शुभारंभ व कामाची पहाणी करताना, सौ.घोडके अनौपचारकि बोलत होत्या. यावेळी माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सुजाता राजेमहाडिक, नगरसेविका धनश्री महाडिक, माजी नगरसेविका स्नेहल राजेशिर्के, माजी नगरसेविका सुनीता फरांदे आदी नक्षत्रच्या सदस्या उपस्थित होत्या.

    नक्षत्र-2018 चा महोत्सव उद्या 8 ते 12 फेबुवारी अखेर आयोजित करण्यात आला आहे. नक्षत्र महोत्सव आयोजित करण्याचे हे सलग 12 वे वर्ष असून यंदा सुमारे 230 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. साताराजिह्यातील उद्योजक व्यावसायिकांसह कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई येथूनही काही व्यावसायिकांनी नक्षत्र प्रदर्शनीय महोत्सवात आपला सहभाग निश्चित केलेला आहे. गृहोपयोगी वस्तुंबरोबरच बचत गटांच्या उत्पादनाला नक्षत्रमध्ये प्राधान्य देण्यात आलेले आहे. वस्तुंबरोबरच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून, बालगोपाळांसाठी तसेच महोत्सवात भेट देणाऱया महिलांकरिता फनी गेम्सचे आणि करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन महोत्सवात दररोज केले गेल आहे. सहभागी स्टॉलधारकांमधून बेस्ट सेल स्टाल आणि बेस्ट डिस्प्ले स्टॉल्सला आकर्षक बक्षिस मान्यवरांच्या हस्ते वितरीत केले जाणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे स्वागत कक्ष, चोख सुरक्षा बंदोबस्त, पिण्याच्या पाण्याची सोय, मुबलक पार्किंग आदी सुविधा कटाक्षाने पुरवण्यावर भर देण्यात आला आहे.  

  नक्षत्र महोत्सव म्हणजे चोखंदळ ग्राहकांसाठी आणि एकंदरीत सातारा जिल्हावासियांसाठी एक चांगली पर्वणी उपलब्ध होत असल्याने, गुरुवार 8  रोजी ठिक सायंकाळी 5.00 वाजता उद्घाटन समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नक्षत्रच्या अध्यक्षा दमयंतीराजे भोसले यांच्या वतीने नक्षत्रच्या उपाध्यक्षा स्मिता घोडके यांनी केले आहे.