|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला सादर होणार

राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला सादर होणार 

26 फेब्रुवारीपासून अधिवेशनाला सुरुवात

28 मार्च रोजी अधिवेशनाची सांगता

संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई / प्रतिनिधी

राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प येत्या 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. केंद सरकारचा वस्तू आणि सेवा कर कायदा (जीएसटी) लागू झाल्यानंतरचा पहिला आणि फडणवीस सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. 2019 मध्ये लोकसभा तसेच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने फडणवीस सरकारसाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 26 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विधानभवनात संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीत अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यात आले. अधिवेशन पाच आठवडे म्हणजे 28 मार्चपर्यंत चालणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण 35 दिवस चालणार असून प्रत्यक्ष 22 दिवस कामकाज होईल. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रांरभ होऊन त्याच दिवशी अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. अधिवेशनात विधानसभेत एक प्रलंबित तर विधानपरिषदेत चार विधेयके प्रलंबित आहेत. याशिवाय चार अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येतील. त्याचबरोबर चार प्रस्तावित अध्यादेश आणि सहा प्रस्तावित विधेयके मंजुरीसाठी मांडली जातील.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ जावळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षाची मोर्चेबांधणी

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी पक्षाविरोधात रणनिती आखण्यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कार्यालयात विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत अधिवेशनात उपस्थित करायच्या मुद्यांवर प्राथमिक चर्चा झाली. पुढील बैठक 25 फेब्रुवारीला विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी होणार आहे. आजच्या बैठकीला ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, काँग्रेसचे भाई जगताप, संजय दत्त, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, डाव्या आघाडीचे  जीवा पांडू गावित, विधानपरिषद सदस्य कपिल पाटील आदी उपस्थित होते.

Related posts: