|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राज्यातील 38,500 कि.मी.चे रस्ते होणार खड्डेमुक्त

राज्यातील 38,500 कि.मी.चे रस्ते होणार खड्डेमुक्त 

बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

2 वर्षात खड्डा पडल्यास ठेकेदार राहणार जबाबदार

रत्नागिरीतील रस्त्यांची कामे मे 2018 पर्यंत होणार पूर्ण

प्रतिनिधी /रत्नागिरी

राज्यातील रस्ते खड्डेमुक्त होण्यासाठी राज्याला प्रथमच 30 हजार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यासाठी ठेकेदारांकडेच खड्डेमुक्त रस्त्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यातील सुमारे 38 हजार 500 कि.मी.चे रस्ते येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त होऊन आरामदायी प्रवास होईल, असे राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचवेळी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी 90 टक्के भूसंपादनाच्या कार्यवाहीची समस्याही मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.

बांधकाम विभाग व महसूल विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी बांधकाम विभागासंबंधित कार्यवाहीबाबत माहिती दिली. येत्या राज्याच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर कामांचा आढावा त्यांनी घेतला. राज्यातील खड्डेमय बनलेल्या रस्त्यांचे चांगले मजबुतीकरण केले जाणार आहे. जेणेकरून प्रवाशांना आरामदायी प्रवास होईल, याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी रत्नागिरी जिल्हय़ातील बांधकामच्या कामांचा आढावा घेत गेल्या पावसाळय़ात खराब झालेल्या येथील 1 हजार 650 कि.मी.च्या राज्य आणि जिल्हा मार्गांचे खड्डे भरण्याची कार्यवाही झाल्याचे पाटील यांनी सांगितले. जिल्हय़ातील गेल्या बजेटमध्ये 100 कोटीची कामे प्रस्तावित होती. त्यातील 52 कोटीची कामांची टेंडर निघाली आहेत. 500 कि.मी.च्या निविदा निघालेल्या आहेत. येत्या मे 2018 पर्यंत पूर्ण होतील, असेही त्यांनी सांगितले.

10 कि.मी.च्या रस्त्यासाठी एक ठेकेदार नेमणार

राज्यात पूर्वी रस्त्यांच्या खड्डे भरण्याची कार्यवाही एकाच ठेकेदारांमार्फत कामे केली जात होती. पण आता त्यात बदल करून 10 कि.मी.च्या रस्त्यासाठी एक ठेकेदार नेमला जाणार आहे. त्यामुळे टेंडर काढणे व रस्त्यांचे मॉनिटरींग करणेही सोपे जाणार आहे. दोन वर्षात त्या रस्त्यावर पडलेला खड्डा व नवीन पडणारा खड्डाही त्या नियुक्त केलेल्या ठेकेदारांनेच भरण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

राज्यात 57 हजार कि.मी.चे रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत. बांधकाम विभागाचा कार्यभार हाती घेण्यापूर्वी राज्यात 5 हजार कि.मी.चे रस्ते राष्ट्रीय महामार्ग होते. मात्र कार्यभार हाती घेतल्यानंतर 22हजार कि.मी.चे रस्ते राष्ट्रीय महामार्ग झाल्याचे पाटील यांनी सांगितले. येत्या 2-3 वर्षात हे सर्व रस्ते चौपदरीकरण केले जाणार आहेत. महाराष्ट्राला प्रथमच बांधकाम विभागाला 30 हजार कोटीचा निधी मिळाला आहे. या निधीतून एकूण 38 हजार 500 कि.मी.चे रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाला येणार गती

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी जवळपास 90 टक्के जमीन अधिग्रहणाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या महामार्गाची कामे जोमाने सुरू आहेत. निर्धारित केलेल्या 10 पॅकेजमधील कामांच्या निविदा व वर्कऑर्डरही निघाल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग चौपदरीकरणासाठी दिलेली ‘डेडलाईन’ जून 2019 पर्यंत ही कामे पूर्णत्वास जातील, असे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.