|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कोरेगाव तालुक्यात महाराजस्व अभियानाद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी : सौ. कीर्ती नलावडे

कोरेगाव तालुक्यात महाराजस्व अभियानाद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी : सौ. कीर्ती नलावडे 

वार्ताहर /एकंबे :

कोरेगाव तालुक्यात महसूल विभागाने अत्यंत चांगले काम करत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. प्रत्येक महसूल मंडलामध्ये महाराजस्व अभियान व विस्तारीत समाधान योजनेद्वारे हजारो दाखल्यांचे वितरण करण्यात आले असून, जनतेची कामे जलदगतीने होत आहेत, असे प्रतिपादन प्रांताधिकारी सौ. कीर्ती नलावडे यांनी केले. 

कोरेगाव महसूल मंडळांतर्गत कठापूर येथे महाराजस्व अभियान व विस्तारीत समाधान योजनेचे शिबिर मंगळवारी झाले. त्याच्या शुभारंभप्रसंगी सौ. नलावडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी तहसीलदार सौ. स्मिता पवार होत्या. मंडलाधिकारी अमोल भुसे, तलाठी सुभाष संकपाळ, सरपंच सौ. हेमा केंजळे, उपसरपंच किरण केंजळे, अशोकराव केंजळे, गोरखनाथ केंजळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

सौ. नलावडे पुढे म्हणाल्या की, सर्वसामान्य जनता ही केंद्रबिंदू मानून राज्य सरकारने महाराजस्व अभियान हाती घेतले असून, या अभियानाद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत जलदगतीने मार्गी लावले जात आहेत. कोरेगाव तालुक्यात या योजनेद्वारे हजारो कामे एका झटक्यात मार्गी लागली आहेत.  

सौ. पवार म्हणाल्या की, तालुक्यातील सधन गाव म्हणून कठापूरची विशेष ओळख आहे. शासनाच्या सर्व योजना या गावापर्यंत पोहचल्या असून, या गावाने आजपर्यंत महसूल विभागाला चांगले सहकार्य केले आहे. कठापूरला जोडणारे मंगळापूर आणि गोडसेवाडी शिवारातील पाणंद रस्ते दर्जेदारपणे तयार करण्यात आले असून, त्यांचे लोर्कापण करताना विशेष आनंद होत आहे. सुमारे पाचशे शेतकर्यांची या रस्त्यांमुळे सोय होणार आहे. 

या शिबिरात रेशनकार्डमध्ये नाव वाढविणे 158, नाव कमी करणे 47, उत्पन्न दाखले 38, रहिवासी दाखले 38, डोंगरी दाखले 18, डोमिसाईल दाखले 18 देण्यात आले. आरोग्य तपासणीचा 380 जणांनी लाभ घेतला. किरण केंजळे  यांनी स्वागत केले. अशोकराव केंजळे यांनी आभार मानले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तलाठी किशोर धुमाळ, शंकरराव काटकर, प्रशांत पवार, बक्षुद्दिन भालदार, दस्तगीर मुलाणी, फिरोज मुलाणी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास कठापूर, गोगावलेवाडी व गोडसेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts: