|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिला उपांत्यपूर्व फेरीत,

भारतीय महिला उपांत्यपूर्व फेरीत, 

वृत्तसंस्था /अलोर सेतार, मलेशिया :

आशिया सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये गुरुवारी भारतीय महिलांना जपानकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. जपानविरुद्धच्या लढतीत पीव्ही सिंधूने भारताचा एकमेव विजय मिळविला. याशिवाय पुरुष संघानेही इंडोनेशियाकडून पराभव स्वीकारला असला तरी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

भारतीय महिलांनी एक विजय व एक पराभव स्वीकारत गट डब्ल्यूमध्ये दुसरे स्थान मिळविले. जपानने पहिले तर हाँगकाँग चीनने तिसरे स्थान मिळविले. भारताने सलामीच्या लढतीत हाँगकाँग चीनवर 3-2 असा विजय मिळविला होता. भारताच्या पुरुष संघाने फिलिपिन्स व मालदिववर एकतर्फी विजय मिळविल्यानंतर गट ड मधून उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले होते.

महिलांच्या पहिल्या सामन्यात सिंधूने जपानच्या जागतिक द्वितीय मानांकित अकाने यामागुचीवरील वर्चस्व कायम राखताना सरळ गेम्सनी विजय मिळविला. सिंधूने हा सामना 21-19, 21-15 असा केवळ 36 मिनिटांत जिंकला. सिंधूने आता यामागुचीवर 5-3 अशी बढत घेतली आहे. मात्र सिंधूला इतर सहकाऱयांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. श्री कृष्ण प्रिया कुदरावल्ली ही सायाको साटोची जोडच ठरू शकली नाही. साटोने हा सामना 21-12, 21-10 असा सहज जिंकून जपानला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. तिसऱया सामन्यात अश्विनी पोन्नप्पालाही आया ओहोरीकडून 14-21, 12-21 असा पराभव स्वीकारावा लागल्याने जपानला 2-1 अशी आघाडी मिळाली.

दुहेरीत भारतीयांकडून अपेक्षा केली जात होती. पण दोन्ही जोडय़ांना पराभूत व्हावे लागले. संयोगिता घोरपडे व प्राजक्ता सावंत यांच्यावर शिहो तनाका व कोहरु योनेमोटो यांनी 21-17, 21-17 अशी मात करून जपानला 3-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. शेवटच्या बिनमहत्त्वाच्या सामन्यात अश्विनी व एन. सिक्की रेड्डी यांनाही मिसाकी मात्सुटोमो व आयाका ताकाहाशी यांच्याकडून 21-18, 21-18 असा पराभव पत्करावा लागला.