|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राज्यातील पोलिसांची डय़ुटी आठ तास करण्याचा विचार

राज्यातील पोलिसांची डय़ुटी आठ तास करण्याचा विचार 

प्रतिनिधी /सोलापूर :

पोलिसांना आठ तासांचीच डय़ुटी असली पाहिजे, प्रायोगिक तत्त्वावर मुंबई येथे पोलिसांना आठ तासांचीच डय़ुटी सुरू आहे. राज्यातही अशाच पध्दतीची आठ तासाची डय़ूटी करण्याचा सरकारचा विचार आहे, असे मत गृहराज्यमंत्री (शहरे) रणजित पाटील यांनी व्यक्त केले.

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला आज गुरूवारी सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, पौर्णिमा चौगुले, शर्मिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे सुर्यकांत पाटील यांच्यासह पोलिस दलातील विविध ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, सोलापुरातील पोलिसांच्या घरासाठी माहिती घेतली असून, त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबर महिन्यात प्रत्येक जिल्ह्य़ाला फॉरेन्सिक लॅब दिलेली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी पोलीस आयुक्ताला मोबाईल लॅब दिलेली आहे. रक्ताचे नमुने, केसाचे नमुने व बोटांचे ठसे अशा अनेक बाबी घेण्यात येत आहेत. तसेच सोलापूर शहरासाठी आणखी चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव आहे. येत्या काळात बैठक घेवून मार्ग काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. यामुळे पोलिसांच्या कामात गती येऊन कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही. याबाबत योग्य नियोजन करण्यात यश येईल. यासाठी लोकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. आगामी काळात पोलीस तपास यंत्रणा आणि बंदोबस्त यंत्रणा वेगळी असा प्रस्ताव आहे. त्यावरण निर्णय व्हायचा असल्याचे पाटील यांनी सांगितले.

भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, राज्य सरकारच्या यंत्रणेकडून शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांवर पाळत ठेवली जात नाही. हा आरोप चुकीचा असल्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितले.