|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकणातील रेल्वेला अर्थबळ कराड-चिपळूण मार्गासाठी 366 कोटी

कोकणातील रेल्वेला अर्थबळ कराड-चिपळूण मार्गासाठी 366 कोटी 

दिघी बंदर-रोहासाठी 25 कोटी

वैभववाडी-कोल्हापूरला 10 लाख

पेण-रोहा दुपदरीकरणासाठी 3 कोटी

लेटेतील रेल्वे कारखान्यासाठी 63 कोटी

प्रतिनिधी /चिपळूण

कोकण-पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱया चिपळूण-कराड रेल्वेमार्ग रद्द झाल्याच्या, प्रकल्पाचा निधी बुलेट ट्रेनसाठी वळवल्याच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला असून या मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तब्बल 366 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, वैभववाडी-कोल्हापूर मार्गाच्या नशिबी अवघे 10 लाख रूपये आले आहेत. त्याचबरोबर कोकणातील दिघी बंदर ते रोहा या नवीन मार्गासह पेण-रोहा दुपदरीकरण आणि लोटे येथील रेल्वेच्या कारखान्यासाठी आर्थिक तरतूद झाल्याने कोकणात रेल्वे वाहतुकीला बळ मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासून कोकण रेल्वे मार्गावर नवीन प्रकल्पासह दुपदरीकरण आणि बंदरे जोड प्रकल्प हे रखडले आहेत. चिपळूण-कराड, वैभववाडी-कोल्हापूर, दिघी बंदर-रोहा हे प्रकल्प मंजूर केले गेले असले तरी त्यासाठीची पुरेशी आर्थिक तरतूद मात्र केली गेली नव्हती. तत्कालिन रेल्वेमंत्री कोकणचे सुपूत्र सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून नव्या प्रकल्पांना चालना मिळाली होती. मात्र प्रभू यांच्याकडील रेल्वे मंत्रीपद गेल्यानंतर कोकणातील रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी कोकणच्या पदरात भरभरून दान पडले आहे.

चिपळूण-कराड मार्गासाठी 366 कोटी

कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱया कराड-चिपळूण रेल्वेमार्गासाटी दोन वर्षापूर्वी सार्वजनिक-खासगी भागीदारी योजनेतून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. व शापूरजी पालोनजी कॉर्पोरेशन या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार झाला होता. मात्र, काही महिन्यांपुवी करार रद्द झाल्याने हा प्रकल्प लटकला होता. यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुलेट ट्रेनसाठी चिपळूण-कराड मार्गाचा बळी दिल्याचा आरोप केला होता. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पात या 112 कि. मी.च्या नव्या रेल्वेमार्गासाठी 1200 कोटीपैकी 366 कोटीची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गात कराड, चिपळूण, वेहळे, मुंढे, कोयना रोड, पाटण, शेडगेवाडी, खोडशी ही स्थानके प्रस्तावित असून 46 किलोमीटरचे बोगदे आहेत. यामध्ये कुंभार्ली घाटात 7 कि. मी. लांबीचा बोगदा सर्वात मोठा असणार आहे.

वैभववाडी-कोल्हापूरसाठी अवघे 10 लाख

कोकण रेल्वेने पश्चिम महाराष्ट्र जोडण्यासाठी चिपळूण-कराडला प्रथम, तर वैभववाडी-कोल्हापूर या नव्या रेल्वे मार्गाला नंतर मंजुरी मिळाली. मात्र तरीही चिपळूण-कराडपेक्षा वैभववाडी-कोल्हापूर या मार्गाच्या हालचाली अधिक गतीमान झाल्या होत्या. यातील एकच प्रकल्प मार्गी लागेल अशीही चर्चा सुरू झाली होती. मात्र आता या दोन्ही प्रकल्पासाठी निधीची तरतूद झाली आहे. मात्र चिपळूण-कराडच्या मानाने वैभववाडी -कोल्हापुर या 107 कि. मी.च्या नव्या रेल्वेमार्गासाठी मंजूर 2 हजार 770 कोटीपैकी अवघे दहा लाख देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे काम काहीसे रोडावण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिघी बंदर-रोहासाठी 25 कोटी

कोकण किनारपट्टीवरील दिघी हे महत्वपूर्ण बंदर कोकण रेल्वेच्या रोहय़ापर्यंतच्या नव्या मार्गाने जोडले जाणार आहे. दिघी बंदर-रोहा या 33 कि. मी. मार्गासाठी मंजूर 724 कोटीपैकी 25 कोटींची तरतुद करण्यात आली आहे, तर पेण-रोहा या 40 कि. मी.च्या दुपदरीकरणासाठी 3 कोटी देण्यात आलेले आहेत.

लोटेतील रेल्वे कारखान्यासाठी 63 कोटी

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विस्तारीत टप्प्यातील असगणी-सात्विणगाव येथे रेल्वे डब्यांसाठीचे सुटे भाग बनवणारा कारखाना उभा रहात आहे. दीड वर्षापूर्वी तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते त्याचे भूमिपूजन झाले होते. भूमिपूजनानंतर पुढे काहीच कार्यवाही न झाल्याने या प्रकल्पाच्या निश्चितीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच 297 कोटी मंजूर रकमेपैकी या अर्थसंकल्पात 63 कोटीचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला चालना मिळणार असून या कारखान्यातून मध्य रेल्वेसह कोकण रेल्वे कार्पोरेशन, पश्चिम रेल्वे, दक्षिण-मध्य रेल्वे व दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या गरजा पुरवल्या जाणार आहेत.

निधी मिळाला, आता प्रकल्प मार्गी लावा- पृथ्वीराज चव्हाण

कॉंग्रेस आघाडीं सरकारच्या काळात मंजूर झालेला चिपळूण-कराड रेल्वे मार्ग ा गुंडाळण्याच्या हालचाली भाजपा सरकारने सुरू केल्या होत्या. या मार्गाचा निधी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनकडे वळवण्याचा प्रयत्न होत असतानाच आपण तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अर्थसंकल्पात या मार्गासाठी निधीची तरतूद झाल्याने त्यांची जलदगतीने अंमलबजावणी व्हावी आणि हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना व्यक्त केली.

Related posts: