|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रिफायनरीच्या जमिनीवर ‘कोल्हापूर’चा डोळा!

रिफायनरीच्या जमिनीवर ‘कोल्हापूर’चा डोळा! 

रत्नागिरीत दलालांचा तळ

स्थानिक नेत्याचा वरदहस्त

शासकीय विश्रामगृहात 600 एकरचे डील?

प्रतिनिधी /रत्नागिरी

राजापुर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प परिसरातील जमिनीला सध्या सोन्याचा भाव आला असून आता कोल्हापुर येथील एका लोकप्रतिनिधीची नजर या जमिनीकडे वळली आहे. जमिन खरेदीसाठी इच्छुक असलेल्या या लोकप्रतिनिधीनीच्या खास माणसांनी रत्नागिरीत तळ ठोकल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या जिल्हास्तरीय नेत्याच्या वरदहस्ताने स्थानिक दलाल व अधिकारी मंडळी यांच्या मदतीने हा ‘व्यवहार’ सुरू असल्याचे समजते. आठवडाभरात सुमारे 600 एकर जमिनीचे ‘डिल’ पार पडत असून शासकीय विश्रामगृहावर याबाबतचे गुफ्तगू सुरू असल्याचे बोलले जात आहे.

राजापुर तालुक्यातील नाणारसह 14 गावांमध्ये महत्त्वाकांक्षी पेट्रोलियम रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. प्रदुषणासह विविध मुद्यांवर स्थानिक जनता, प्रकल्पग्रस्त व मच्छीमारांकडून याला तीव्र विरोध होत आहे. मात्र, याचवेळी प्रकल्प पुढे रेटण्याच्या हालचाली प्रशासनाकडून गतीमान झाल्या आहेत. या परिसरातील बहुतेक जमीन ही ओसाड माळरान असून प्रस्तावित प्रकल्पामुळे या जमिनीचे दर वधारले आहेत. शासनाकडून मिळणाऱया नुकसानभरपाईच्या गलेलठ्ठ रकमेसह अन्य शासकीय योजनांच्या लाभावर डोळा ठेवून अनेकांनी अल्प मोबदल्यात या जमिनी खरेदी करण्याचा सपाटा चालवला आहे. जमिनीचे खरेदी-विक्री करणाऱया दलालांचाही त्यामुळे सुळसुळाट झाला आहे. याबाबत राजकीय पक्ष एकमेकांकडे अगुलीनिर्देश करत आहेत. मात्र सर्वच पक्षांचे दलाल कार्यरत असल्याचे स्थानिक जनतेचे म्हणत आहेत.

स्थानिक राजकीय नेते व पदाधिकारीही जमिन खरेदीत आघाडीवर असल्याची चर्चा सुरु असतानाच आता कोल्हापुर येथील एका बडय़ा लोकप्रतिनिधीनीनेही आपली नजर याकडे वळवल्याचे दिसून येत आहे. यासाठी सत्ताधारी स्थानिक नेत्याच्या मदतीने मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. त्यासाठी कोल्हापूरच्या नेत्याची खास माणसे रत्नागिरीत तळ ठोकून आहेत. एमएच-09 व एमएच-11 कमांकाची अलीशान वाहने माळनाका परिसरात पाहायला मिळत आहेत. कोल्हापुरातील या दलालांनी स्थानिक दलालांच्या मदतीने जमीन मालकांची कागदपत्रे मिळवण्यास सुरूवात केली आहे. शासकीय विश्रामगृहावर रात्रीउशीरापर्यंत याबाबतचे गुफ्तगू होत असल्याची चर्चा आहे.

सुमारे 600 एकरचे ‘डील’?

कोल्हापुरातील लोकप्रतिनिधीने धाडलेले खास दूत आणि स्थानिक दलालांच्या जाळय़ात प्रस्तावित रिफायनरी परिसरातील अनेक जमिन मालक सापडले आहेत. एका जिल्हा पातळीवरील नेत्याने कोल्हापुरातील या दलालांची बडदास्त ठेवल्याचीही चर्चा आहे. रिफायनरी परिसरातील सुमारे 600 एकर जमिनीचे व्यवहार अंतिम टप्प्यात असल्याचे या व्यवहारात सहभागी असलेल्या एका व्यक्तीकडून सांगितले जात आहे. दरम्यान या व्यवहारांसाठी जिल्हय़ातील एका नेत्याने बळ पुरवल्याने या प्रकियेला वेग आला आहे.

तत्काळ रोख रकमेचे आकर्षण

रिफायनरी प्रकल्प मार्गी लागल्यास जमीन मालकांना शासकीय योजनेप्रमाणे किमान चौपट मोबदला मिळणार आहे. मात्र त्यासाठी लागणारा वेळ व कागदपत्रांची पुर्तता यासाठी प्रदिर्घ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. त्यातच प्रकल्प रद्द होणार असल्याच्या चर्चा व घोषणा वारंवार होत असतात. स्थानिकांच्या नेमक्या या द्विधा मनस्थितीचा फायदा दलाल उठवत आहेत. नेमक्या जमिन मालकांना शोधून काढून त्यांना प्रकल्प रद्द होण्याचे भय दाखवत तत्काळ जादा रक्कम देण्याची तयारी दलालांनी दाखवली आहे. त्यामुळे ताबडतोब मिळणाऱया मोठय़ा व रोख रकमेच्या मोहात पडून अनेक जमीन मालक सध्याच्या दरापेक्षा वाढीव दराने जमीनी देण्यास तयार होत आहेत. शिवाय कुळकायदा, भाऊबंदकी, तुकडा बंदी, न्यायालयीय प्रक्रिया आदींमध्ये अडकलेले जमीना मालक अशा दलालांच्या जाळय़ात अलगद सापडत आहेत.

Related posts: