|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » स्वत:चा काटा स्वत:लाच रूतणाऱया गुलाबाची गोष्ट

स्वत:चा काटा स्वत:लाच रूतणाऱया गुलाबाची गोष्ट 

गुरू प्रॉडक्शन्स आणि आरती आर्ट अकादमी निर्मित संभाजी सावंत लिखित आणि प्रदीप कबरे दिग्दर्शित ‘शिकस्त’ या नाटकाचे प्रयोग नव्या कलाकारांच्या संचात सध्या होत आहेत.

स्वत:च्याच काटय़ाने घायाळ होणाऱया एका गुलाबाची गोष्ट असलेले हे नाटक आहे. या नाटकातली सरिता ही अशी एक व्यक्तिरेखा आहे, की जी स्वतंत्रपणे अभ्यास करण्यासाठी समाजातल्या काही व्यक्तिंची निवड करते आणि नीतिशास्त्राच्या दृष्टीने त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून त्यावर लेख प्रकाशित करत असते. निरा या महिलेबद्दल तिला विलक्षण कुतूहल वाटत असते कारण सिंगल पेरेंटिंगच्या प्रश्नामुळे ती चर्चेत आलेली असते. सर्वसामान्यांपासून दूर राहणे तिने पसंत केलेले असते. तिचा पत्ता शोधण्यासाठीही सरिताला खूप आटापिटा करावा लागतो. अखेर ती निराचा पत्ता मिळवते आणि स्वत:च्या नवऱयासोबत निरा राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये जाऊन पोहोचते. त्याच ठिकाणी राहणाऱया भार्गवरावांशी तिची गाठ पडते आणि त्यांच्या माध्यमातून ती निराच्या घरात पोहोचते. सुरुवातीला नमस्कार, आगत-स्वागत होते. याच वेळी भार्गवचे आणि निराचे संबंध कसे आहेत याची झलक पाहायला मिळते. अत्यंत परोपकारी भार्गवचा निराला नेहमीच आधार वाटत असतो. आपला येण्याचा हेतू सरिता सांगते तेव्हा खऱया अर्थाने नाटकातल्या घडामोडींना सुरुवात होते. हे संपूर्ण नाटक निराच्या घरामध्येच म्हणजे प्रामुख्याने तिच्या ड्रॉईंग रुममध्येच घडते. ही ड्रॉईंग रुम कंपनीचे ऑफिस भासावे अशाप्रकारच्या नेपथ्यातून दाखवली आहे.

एका क्षणाला आपल्या नवऱयापासून तर हे अपत्य निराला झालेले असावे काय असा संशय सरिताच्या मनात येतो. तसेच दुसऱया एका क्षणाला तर सरिता स्वत:च्याच नवऱयावर तसा स्पष्ट आरोप करते तेव्हा सरिताच्या नवऱयाचे अस्वस्थपण, पराकोटीचा संताप तसेच आणखीही काही भाव, तीव्र नाराजीच्या छटा चेहऱयावर आणि प्रतिक्रिया संपूर्ण शरिरावर दिसणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात या नाटकातला सरिताचा नवरा अत्यंत शांतपणे कोणी तरी दुसऱयाबद्दल काही तरी सांगत असावे अशाप्रकारे ऐकून घेतो आणि शांत राहतो. हे कसे घडू शकते याचे आश्चर्य वाटते. एका कलावंताचा प्रतिक्रियाशून्य असा थंड प्रतिसाद संपूर्ण नाटकाला उणेपणाकडे घेऊन जातो हे लक्षात घेतले पाहिजे. अशा आणखीही काही घटना यात आहेत. भावनिक प्रसंगांमध्ये भावनाच व्यक्त होणे अपेक्षित असते. त्या झाल्या नाहीत तर प्रेक्षकाची निराशा होते. चर्चेतून निघालेला विषय तर्काच्या कसोटय़ा लावत नीती-अनीतीच्या तपशीलांना स्पर्श करत भावनिक पातळीवर पोहोचतो, तो प्रवास नाटककाराने व्यवस्थित दाखवला आहे. तसेच हातातले बूमरँग आपल्याकडेच परतणार आहे, किंबहुना उलटणार आहे याचे भान ते सोडणाऱयाने नेहमीच बाळगले पाहिजे, हे अधोरेखित करणारा हा नाटय़ाविष्कार आहे.

सरिताच्या या मध्यवर्ती भूमिकेला अनेक छटा आहेत. तिचा एकीकडे दिसणाऱया परिस्थितीच्या विरोधात लढा सुरू असतो आणि दुसरीकडे समोरच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना स्वत:च्या विचारांशीही तिचा लढा सुरू असतो. ही घुसमट स्वरांगी बापट यांनी बऱयापैकी व्यक्त केली आहे.

भार्गव ही भूमिका संदीप कबरे यांनी अत्यंत समजून आणि सहजपणे केली आहे. त्यांचे वावरणेही नैसर्गिक वाटत होते. मात्र, पालूपदाचा अति वापर सहज टाळता आला असता. निरा झालेल्या रेश्मा मर्चंट आणि दिनू झालेल्या सलील गांधी यांनी मात्र आपण करत असलेली व्यक्तिरेखा प्राप्त परिस्थितीत कशी वाटेल हे लक्षात घेऊन वाचिक आणि कायिक अभिनय केला पाहिजे. तर त्याचा परिणाम प्रेक्षकाला जाणवेल. संहिता समजून घेऊन ते प्रसंग प्रवाही राहतील अशाप्रकारे दिग्दर्शक प्रदीप कबरे यांनी हे नाटक बसवले आहे.

आपल्याच काटय़ाचा आपल्यालाही त्रास होऊ शकतो याची जाणीव गुलाबाला करून देणाऱया नाटकाच्या या लेखनात संभाजी सावंत यांनी एक सरळ सूत्र पकडले आहे. मात्र ते मांडताना त्यातले रहस्य अखेरपर्यंत टिकून राहील याची काळजी तर त्यांनी घेतली आहेच. त्याचबरोबर कल्पनाही करता येणार नाही अशाकडे जेव्हा बोट दाखवले जाते आणि सारा उलगडा होतो, तोवर ते रहस्य कल्पकतेने त्यांनी टिकवून ठेवले असल्याने नाटकाच्या कथानकाला रंगत आली आहे. या नाटकाचे काही प्रयोग यापूर्वी झाले आहेत. आणि सध्याचे प्रयोग नव्या कलाकारांच्या संचात होत असल्याने नव्या-जुन्याची तुलना होण्याची शक्यता आहे.  सगळय़ा कुटुंबाने एकत्र पाहावे असे हे नाटक आहे.

Related posts: