|Friday, January 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोदी आणि ट्रंप यांच्यात मालदीववर चर्चा

मोदी आणि ट्रंप यांच्यात मालदीववर चर्चा 

पंतप्रधानांचे चार देशांच्या दौऱयावर निर्गमन   कतारचा दौरा आहे महत्वाचा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांकडून या चर्चेचा तपशील अधिकृतरित्या घोषित करण्यात आला नसला तरी ही चर्चा मालदीवमधील परिस्थितीवर होती अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर मोदी चार आखाती देशांच्या दौऱयावर रवाना झाले.

ट्रंप यांनी मोदी यांच्याशी मालदीवमधील परिस्थितीविषयी सुमारे 25 मिनिटे चर्चा केली, असे समजते. ट्रंप यांनी तेथील स्थितीविषयी अमेरिकेला चिंता वाटत असल्याचे स्पष्ट केले. तसेच भारताच्या भूमिकेला पाठिंबा व्यक्त केला. मालदीवमध्ये सध्या राजकीय गोंधळाचे वातावरण आहे. तेथील अध्यक्ष गयूम यांनी देशातील लोकशाहीचा गळा घोटला असून माजी अध्यक्ष नशीद यांना कारागृहात डांबले आहे. त्यांची सुटका करण्याचा आदेश त्यांनी धाब्यावर बसवला असून सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणून हा आदेश बदलावयास भाग पाडले आहे.

ट्रंप आणि मोदी यांच्या चर्चेत मालदीवप्रमाणेच दक्षिण चीन समुद्र आणि आशिया प्रशांतीय विभागातील परिस्थितीवरही चर्चा करण्यात आल्याचे समजते. भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच संरक्षण सहकार्याविषयी चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा दूरध्वनी संवाद महत्वाचा मानण्यात येत आहे.

मोदी विदेश दौऱयावर

मोदी शुक्रवारी दुपारी मध्यपूर्वेतील चार देशांच्या दौऱयावर रवाना झाले. ते पॅलेस्टाईनला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. ते शुक्रवारी संध्याकाळी जॉर्डन मार्गे पॅलेस्टाईनला पोहचले. त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. हा दौरा छोटा असून त्याला केवळ औपचारिक महत्व आहे. तथापि, पॅलेस्टाईन नेते अब्बास यांनी मोदींचे या दौऱयाबद्दल अभिनंदन केले असून मोदी जागतिक नेते आहेत, अशी भलावण केली आहे.

संघर्ष मोदींनी मिटवावा

पंतप्रधान मोदी जागतिक नेते असून त्यांचा जगातील अनेक नेत्यांवर प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी इस्रायल आणि अरब यांच्यातील संघर्ष मिटवावा, असे आवाहन पॅलेस्टाईन नेत्यांनी केले आहे. हा संघर्ष गेली सुमारे 70 वर्षे सुरू असून अरब देश आणि इस्रायल यांच्यात 3 युद्धेही झाली आहेत. शांतता चर्चा होऊनही संघर्ष मिटलेला नाही. भारताने मध्यस्थी करावी, अशी अपेक्षा अब्बास यांनी व्यक्त केली.

शनिवारपासून युएई दौरा

मोदी शनिवारी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱयावर जाणार आहेत. त्यानंतर ते रविवारी कतार देशाचा दौरा करतील. कतार भारताला नैसर्गिक वायूचा पुरवठा करतो. या दोन्ही दौऱयांमध्ये ते गुंतवणूक, द्विपक्षीय संबंध, आंतरराष्ट्रीय परिस्थिती, मध्यपूर्वेतील राजकारण आणि इतर संबंधित विषयांवर चर्चा करतील. ही चर्चा सफल होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Related posts: