|Friday, February 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘हनी ट्रप’मध्ये अडकला हवाई दल अधिकारी

‘हनी ट्रप’मध्ये अडकला हवाई दल अधिकारी 

‘आयएसआय’ला पुरविली गोपनीय माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ला गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी भारतीय हवाई दलाचा ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह याला शुक्रवारी अटक केली. 51 वर्षीय मारवाह हा पाकिस्तानने रचलेल्या ‘हनी ट्रप’मध्ये अलगद अडकला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीशी सेक्स चॅटिंग करत होता. तिच्या अश्लील व्हिडीओसाठी त्याने हवाई दलातील गोपनीय माहिती व्हॉट्सऍपच्या माध्यमातून आयएसआयला दिली असल्याची धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली.

आयएसआय एजंट असणाऱया एका 20 वर्षीय तरुणीने फेसबुकच्या माध्यमातून मारवाहशी संपर्क साधला. तिने किरण रंधवा असे आपले नाव सांगून त्याला आपल्या जाळय़ात ओढले. यानंतर दोघांमध्ये व्हॉट्सऍपच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. यासाठी स्वत: सीमकार्डही घेऊन दिले. गेली काही दिवस तो तिच्याशी अश्लील संवाद करत होता. यानंतर त्याने तिला अश्लील व्हिडीओ पाठविण्यास सांगितले. याबदल्यात तिची कोणतीही मागणी पुरविण्यास मारवाह तयार झाला. त्याने आयएसआयला भारतीय हवाई दलाच्या विशेष युद्ध सरावाबरोबरच लढाऊ विमानांची माहिती आणि सायबर युद्धासंदर्भातील कागदपत्रे व्हॉट्सऍपच्या माध्यमातून दिली.

ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद वाटत होत्या. हवाई दलाच्या मुख्यालयात तो मोबाईल फोनचा वापर करत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. 31 जानेवारी रोजी त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. याची सखोल चौकशी केली. आपण तरुणीबरोबर अश्लील चॅटिंग करत होतो. यासाठीच गोपनीय माहिती आपण आयएसआयला पुरविण्याचे मारवाह याने कबूल केले आहे. त्याच्याविरोधात गोपनीय सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Related posts: