|Sunday, January 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बिटकॉईन खरेदीदारांना प्राप्तिकर विभागाची नोटीस

बिटकॉईन खरेदीदारांना प्राप्तिकर विभागाची नोटीस 

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

बिटकॉईन खरेदीदार आता प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणाऱया 300 जणांना प्राप्तिकर विभागाने गुंतवलेल्या रकमेचा तपशील मागवला आहे. या पैशाच्या उत्पन्नाचा स्रोत कोणता याचीही विचारणा करण्यात आली आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेनेही बिटकॉईन या अभासी चलनातील गुंतवणुकीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. बिटकॉईन खरेदी भविष्यात मोठी धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगातील सर्वात मोठा घोटाळा आणि भ्रष्टाचार बिटकॉईनच्या माध्यमातून केला जात असून यामधील गुंतवणूक मुर्खपणाची ठरु शकते, असेही रिझर्व्ह बँकेने त्यांच्या निवेदनामध्ये म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही बिटकॉईनमधील गुंतवणुकीबाबत आणि वाढत्या किमतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बिटकॉईनसह सर्व प्रकारची अभासी चलन बेकायदा असल्याचे सांगितले असून सरकार ते संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अर्थसंकल्प सादर करताना स्पष्ट केले होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष (सीबीडीटी) सुशील चंद्रा यांनीही या गुंतवणुकीला सक्त विरोध दर्शवला आहे. या गुंतवणुकीवर मोठय़ा प्रमाणात कर आकारणी करण्याचेही सुतोवाच केले आहे.

या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागानेही बिटकॉईन खरेदीदारांना आपल्या रडारवर आणले आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणाऱयांना तातडीने नोटीस बजावण्यात आली असून यामध्ये पहिल्या यादीत 300 जणांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाने गुंतवणूकदारांना या गुंतवणुकीपासून मिळणाऱया उत्पन्नाचीच माहिती मागवली नसून त्यामध्ये केलेल्या गुंतवणूक रकमेचा तपशीलही मागवला आहे. या सर्वांच्या प्राप्तिकर परताव्याबाबतची फेरतपासणी केली जाणार आहे. उत्पन्नामध्ये बिटकॉईनमधील गुंतवणुकीचाही तपशील नोंदवून त्याची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये काही चुकीचे अथवा बेकायदेशीर आढळल्यास संबंधितांवर फसवणुकीचा स्वतंत्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. बिटकॉईन खरेदीबाबत गेल्यावर्षी सर्वच स्टॉक एक्स्चेंजमधून माहिती गोळा केली होती. त्यानंतरच या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

बिटकॉईन कोणत्याही एका देशाचे चलन नाही अथवा कोणत्याही बँकेने ते जारी केलेले नाही. त्यामुळे तूर्तासतरी बिटकॉईन गुंतवणुकीवर कोणाचेच नियंत्रण नाही. ही एक अभासी चलन मानले जात असून त्यावर कोणताही कर आकारला जाऊ शकत नाही. सरकारच्या परस्पर यामध्ये गुंतवणूक होत असल्याने त्यामुळे यामध्ये फसवणूक झाल्यास भारत सरकार, रिझर्व्ह बँक अथवा सेबी कोणीही जबाबदार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे या गुंतवणुकीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

Related posts: