|Friday, August 17, 2018
You are here: Home » क्रिडा » बर्फाच्या क्रिकेटमध्येही सेहवागचा धमाका, ‘हथियार छोडे है, चलाना नही भुले’!

बर्फाच्या क्रिकेटमध्येही सेहवागचा धमाका, ‘हथियार छोडे है, चलाना नही भुले’! 

वृत्तसंस्था/ सेंट मॉरित्झ-स्वित्झर्लंड

एकेकाळी टर्फ विकेटवर धमाकेदार, स्फोटक फलंदाजीचे युग गाजवणाऱया वीरेंद्र सेहवागने शनिवारी स्वित्झर्लंडच्या बर्फाळ विकेटवर देखील तोच करिष्मा गाजवताना प्रदर्शनीय लढतीत 31 चेंडूतच 62 धावांची आतषबाजी केली आणि त्यानंतर ट्वीटरवर अनोखी टिपणी करत त्यातही आपला हात धरणारा कोणी नसल्याचे आणखी एकदा दाखवून दिले. या अनोख्या ट्वीटमध्ये तो म्हणाला, ‘हथियार छोडे है, चलाना नही भुले’!

स्वित्झर्लंडमध्ये आयोजित दोनपैकी पहिल्या प्रदर्शनीय लढतीत सेहवागने पॅलेस डायमंड्स संघाचे प्रतिनिधीत्व केले. या संघाची लढत शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील रॉयल्सविरुद्ध झाली. त्यात सेहवागने शोएब अख्तरचाही विशेष समाचार घेतला. पहिल्याच चेंडूवर चौकाराने स्वागत करत नंतर त्याने स्फोटक फलंदाजीचा सिलसिला सुरु केला. ‘नजफगडचा नवाब’ म्हणून ओळखल्या जाणाऱया सेहवागने आपल्या फलंदाजीतील नजाकत येथे नव्याने दाखवून दिली आणि दशकभर घोटवलेले फटके अद्याप आपली बॅट विसरलेली नाही, याचीच जणू ही प्रचिती होती. सेहवागचा संघ येथे पराभूत झाला. पण, त्याची वैशिष्टय़पूर्ण फलंदाजी सर्वाधिक लक्षवेधी ठरली.

आफ्रिदीच्या संघातर्फे माजी इंग्लिश फलंदाज ओवेस शाहने 34 चेंडूत नाबाद 74 धावांचे योगदान दिले व याच बळावर ते विजयी ठरले. स्वित्झर्लंडमध्ये क्रिकेटच्या प्रसारासाठी या प्रदर्शनीय लढतीचे आयोजन केले गेले. माईक हसी, शोएब अख्तर व महेला जयवर्धने यांच्यासारखे माजी दिग्गज खेळाडू यात सहभागी झाले आहेत. सेंट मॉरित्झच्या गोठलेल्या तळय़ावर हे सामने भरवले जात असून लाकडी प्लँकवर मॅटिंग पिच बसवली गेली आहे. गुलाबी चेंडूवर येथे सामने खेळवले जात आहेत.

सेंट मॉरित्झवर यापूर्वी 1928 व 1948 मध्ये दोन हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत. सध्याच्या घडीला स्वीस सरकार या ठिकाणाला टुरिस्ट हब म्हणून अधिक ओळख प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. स्वित्झर्लंडचे भारतीयांना विशेष आकर्षण रहात आले असले तरी झुरिच व माऊंट टिटलिस या दोनच ठिकाणांना त्यांची विशेष पसंती रहात आली आहे. यापैकी, टिटलिसवर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, या चित्रपटाचे चित्रीकरणही झाले आहे.

Related posts: