|Friday, February 22, 2019
You are here: Home » क्रिडा » ‘माईलस्टोन’ मालिकाविजयाचे आज ‘विराट’ इरादे

‘माईलस्टोन’ मालिकाविजयाचे आज ‘विराट’ इरादे 

आफ्रिकन भूमीत पहिल्यावहिल्या मालिकाविजयासाठी भारतीय संघ सज्ज

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

दक्षिण आफ्रिकन भूमीतील पहिल्यावहिल्या ‘विराट’ मालिकाविजयासाठी भारतीय संघ सज्ज असून आज (दि. 10) येथे होणाऱया चौथ्या वनडेतच त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे विराटसेनेचे बुलंद इरादे असणार आहेत. दुसरीकडे, एबी डिव्हिलियर्स तंदुरुस्त होऊन संघात परतल्याने दक्षिण आफ्रिकेसाठी हा एकमेव आशेचा किरण असेल. 6 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 3 सामन्यानंतर 3-0 अशा एकतर्फी आघाडीवर असून दिवस-रात्र होणाऱया आजच्या लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 4.30 वाजता सुरुवात होणार आहे.

भारताला मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आता केवळ एकच विजय आवश्यक असून जोहान्सबर्गमध्येच त्यावर मोहोर उमटवण्याचा भारताचा प्रयत्न असेल, हे साहजिक आहे. यापूर्वी, 2010-11 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिकाविजयाच्या समीप आला. एकवेळ त्यावेळी 2-1 अशी आघाडी त्यांनी मिळवली. पण, नंतर 5 सामन्यांच्या त्या मालिकेत भारताला 3-2 अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने 1992-93 पासून दक्षिण आफ्रिका दौऱयावर जाणे सुरु केल्यानंतर त्यांच्या भूमीत यंदा प्रथमच सलग 3 वनडे जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे. येथे सलग चौथा विजय संपादन केल्यास भारताचे अव्वलस्थान देखील आणखी भक्कम होऊ शकेल.

कुलदीप-यजुवेंद्रचे आतापर्यंत 23 बळी

यापूर्वी केपटाऊनमध्ये तिसऱया वनडेत विराट कोहलीने 34 वे वनडे शतक झळकावल्यानंतर भारताने सहज विजयावर शिक्कामोर्तब केले. अर्थात, या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात 30 पैकी 23 बळी केवळ कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल या उभयतांनीच गारद केले असून त्यांचाही या विजयातील वाटा सिंहाचा राहिला आहे.

दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी या उभयतांच्या भेदक माऱयाचा बीमोड करण्यासाठी स्थानिक 5 फिरकीपटूंना सराव सत्रात पाचारण केले. पण, त्या सरावानंतरही फारसे चित्र बदलले नसल्याचे तिसऱया वनडेत सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ, स्पष्ट दिसून आले. आफ्रिकन संघाचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स उर्वरित 3 सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. पण, तो पूर्ण तंदुरुस्त आहे का व त्याला चौथ्या वनडेत निश्चितपणाने खेळवले जाणार का, याबद्दल दक्षिण आफ्रिकन व्यवस्थापनाने शुक्रवारी सायंकाळपर्यंत काहीच घोषणा केली नव्हती. यापूर्वी तिसऱया व शेवटच्या कसोटीत बोटाला दुखापत झाल्यानंतर पहिल्या तीन वनडेत तो खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.

डिव्हिलियर्स या लढतीसाठी उपलब्ध झाल्यास, तो तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरेल व जेपी डय़ुमिनीला चौथ्या स्थानी यावे लागेल. तो संघात आल्यास डेव्हिड मिलेर व झोन्डो यांच्यापैकी एकाला वगळले जाईल, असे संकेत आहेत. मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या पदरी प्रचंड अपयश आले असले तरी येथेही मॅरक्रमकडेच नेतृत्वाची धुरा कायम असेल, हे देखील फारसे आश्चर्याचे नाही.

आफ्रिकेसह डिव्हिलियर्सलाही गुलाबी पोषाख अनुकूल

2011 पासून सुरू झालेल्या पिंक वनडेत द.आफ्रिकेला एकदाही पराभव स्वीकारावा लागलेला नाही. याशिवाय गुलाबी पोशाखात एबी डिव्हिलियर्सचा खेळ बहरतो, असे यापूर्वी दिसून आले आहे. 2015 मध्ये त्याने विंडीजविरुद्ध अवघ्या 44 चेंडूतच चक्क 149 धावांची आतषबाजी केली तर 2013 मध्ये भारताविरुद्धही त्याने 47 चेंडूत 77 धावांची बरसात केली होती. त्या लढतीत आफ्रिकेने 4 बाद 358 धावांचा डोंगर रचला तर भारताला 141 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्या दिवशी डेल स्टेन व मॉर्नी मॉर्कल यांच्याविरुद्ध रोहित शर्मा कमालीचा झगडला होता. तेथे त्याला 43 चेंडूत केवळ 18 धावांवर समाधान मानावे लागले होते.

वनडेत तीन द्विशतके झळकावणाऱया या दिग्गज फलंदाजाला दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या 11 वनडेत मात्र जेमतेम 12.10 अशी किरकोळ सरासरी नोंदवता आली आहे. अंतिम संघातून त्याला वगळले जाणे अपेक्षित नसले तरी त्याचा खराब फॉर्म मात्र अर्थातच चिंतेचा ठरत आला आहे. या मैदानावर भारताने जानेवारी 2011 मध्ये विजय मिळवला होता. त्यावेळी मुनाफ पटेलने 29 धावात 4 बळी घेतल्यानंतर भारतीय संघाने एका धावेने थरारक, निसटता विजय संपादन केला होता.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर.

दक्षिण आफ्रिका : एडन मॅरक्रम (कर्णधार), हाशिम आमला, जेपी डय़ुमिनी, इम्रान ताहीर, डेव्हिड मिलेर, मॉर्नी मॉर्कल, ख्रिस मॉरिस, लुंगी एन्गिडी, अँदिले पेहलुकवायो, कॅगिसो रबाडा, तबरेझ शामसी, झोन्डो, फरहान बेहार्दिन, हेनरिच क्लासेन (यष्टीरक्षक), एबी डिव्हिलियर्स.

सामन्याची वेळ : सायं. 4.30 पासून.

स्तनाच्या कॅन्सरविरुद्ध जनजागृतीसाठी आफ्रिकन खेळाडूंचा ‘गुलाबी पोशाख’

मायदेशातील या हंगामातील हा सामना दक्षिण आफ्रिकन संघासाठी आणखी एका कारणाने विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. स्तनाच्या कॅन्सरविरुद्ध जनजागृती व सध्या या आजाराने जे त्रस्त आहेत, त्यांना साहाय्य द्यावे, या उद्देशाने आफ्रिकन खेळाडू येथे गुलाबी पोशाखात मैदानात उतरतील. 2011 मध्ये सर्वप्रथम या आजाराविरोधात जनजागृतीसाठी आफ्रिकन खेळाडूंनी प्रथमच पुढाकार घेतला. त्यानंतर आजतागायत 5 वेळा ते गुलाबी पोशाखात मैदानात उतरले आहेत. आजवर या पोषाखात उतरल्यानंतर ते पाचही वेळा विजयी ठरले आहेत, हा आणखी एक योगायोग. विराटसेना बहरात असताना त्यांची ती विजयी परंपरा आजही अखंडित ठेवणे त्यांच्यासाठी मात्र अर्थातच आव्हानात्मक ठरु शकते.

 

Related posts: