|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपा निवडणूक आ.गाडगीळांच्याच नेतृत्वाखाली : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मनपा निवडणूक आ.गाडगीळांच्याच नेतृत्वाखाली : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील 

प्रतिनिधी/ सांगली

 केवळ डिजीटल लावून अथवा हवाई प्रचार करून निवडणुका जिंकता येत नाहीत तर त्यासाठी लोकांची कामे करणे महत्वाचे असल्याचा टोमणा मारत महापालिकेत भाजपाचाच ब्रॅण्डेड महापौर होणार, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत व्यक्त केला. मनपा निवडणुकीचा सर्व्हेचा निकाल आपल्या खिशात असल्यानेच आपण हा दावा करत असल्याचे सांगतानाच आ. सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात येणार असून माजी आमदार दिनकर पाटील आणि माजी उपमहापौर शेखर इनामदार हे त्यांना समन्वयकाची भुमिका पार पाडतील, अशी घोषणाही त्यांनी केली.

 भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापालिका क्षेत्रातील बुथ कमिटय़ांच्या अध्यक्षांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. शुक्रवारी सायंकाळी भावे नाटय़मंदीरमध्ये मेळावा झाला. यात बुथ अध्यक्षांना शहरात कुटूंबांना भाजपाशी जोडण्यासाठी भेटवस्तूंचे वाटप करण्याबरोबर संपर्क अभियान राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. केवळ हवेत फुगे उडवणे, डिजीटल बोर्ड झळकवणे, अथवा हवाई प्रचार करून मतं मिळत नाहीत तर त्यासाठी लोकांची कामं करावी लागतात. त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे लागते, असा टोला काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांचे नाव न घेता मारून चंद्रकांत पाटील यांनी भाषणाची सुरूवात केली. भाजपामध्ये बुथ प्रमुखांना नेत्याइतकीच किंमत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्वतः गुजरातमधील एका बुथचे अध्यक्ष असल्याचे सांगून पाटील म्हणाले, बुथ कमिटय़ा भक्कम झाल्यास निवडणुका जिंकणे डाव्या हाताचा मळ आहे.

  मनपा क्षेत्रात एक लाख कुटुंबाना भेटवस्तु देणार

  निवडणुकीत अचानक मतं मागण्यासाठी न जाता लोकांशी संपर्क वाढवा. त्यांच्या घरापर्यंत जा असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यासाठी प्रत्येक बुथला 200 भेटवस्तु देण्यात येणार आहेत. येत्या सोमवारपासून हे संपर्क अभियान राबविण्यात येणार असून 25 फेब्रुवारी रोजी हे अभियान संपवण्याची सूचनाही त्यांनी केली. आपल्यालाही एका बुथची जबाबदारी द्या, प्रत्येक आठवडयाला आपण येऊन लोकांशी संपर्क साधू, अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या जुलै महिन्यात महापालिका निवडणूक होईल. तोपर्यंत प्रत्येक कुटूंबाला किमान चार वेळा भेट द्या. त्यांच्या अडचणी समजून घ्या. त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. लोक तुम्हाला चहा देतीलच पण मतेही देतील, अशी टिपणी पाटील यांनी केली. कोल्हापूरमध्ये आम्ही हा प्रयोग यशस्वी केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

    मनपा बरोबरच विधानसभा आणि लोकसभाही भाजपाच जिंकणार

 महापालिकेची निवडणूक भाजपाच जिंकणार हे आपले भविष्य आहेच. पण  विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही भाजपाचीच सरशी असेल, असा दावाही त्यांनी केला. आपला हा दावा ज्योतिषावर आधारीत नाही. तर गेल्या चाळीस वर्षातील राजकीय अनुभव आहे. तो कधी फेल जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर महापालिका निवडणुकीचा सर्व्हे नागपूरच्या संस्थेकडून करण्यात आला आहे. त्याच्या अहवालाचा कागद आपल्या खिशात आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपाचाच महापौर असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

    आम्हाला कोणी अस्पृश्य नाही,  प्रवेश सर्वांना देऊ पण उमेदवारी सर्व्हे सांगेल त्यालाच

 महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादीमधील अनेक नगरसेवक भाजपात येण्यास इच्छूक आहेत. आम्हाला कोणीही अस्पृश्य नाही. मेरीट पाहुन प्रवेश देण्यात येईल. काही प्रमाणात पार्श्वभूमी पाहून सर्वांनाच प्रवेश देऊ पण उमेदवारीचा शब्द कोणालाच देणार नाही. सर्व्हे सांगेल त्यालाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीतील कार्यकर्त्याचा प्रवेश 

 माजी नगराध्यक्ष मोहनसिंग रजपूत, दिनकर चव्हाण, रघुनाथ बोराडे, सुधीर पाटील, महेश मजगे, कॅ. बबन खाडे, संजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

खा.पूनम महाजन 22 रोजी सांगली दौऱयावर

भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा खा. पूनम महाजन 22 फेबुवारी रोजी पश्चिम महाराष्ट्र दौऱयावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत युवा मेळाव्याबरोबरच अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 22 रोजी सायंकाळी पाच वाजता भावे नाटय़मंदिरात युवा मोर्चाचा मेळावा होणार असल्याचे मकरंद देशपांडे यांनी सांगितले.

 माजी उपमहापौर शेखर इनामदार यांनी बुथ अध्यक्षांच्या हजेरीसह स्वागत व प्रास्तविक केले. महापालिका निवडणूकीसाठी पक्षाने सुरू केलेली तयारी सांगितली. त्याचबरोबर बुथकमिटय़ा अध्यक्षांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.

यावेळी आ. सुधीर गाडगीळ, माजी आ. दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सौ. नीता केळकर, मुन्ना कुरणे, बटूदादा बावडेकर, सुब्राव मद्रासी, भारती दिगडे, सुरेंद्र चौगुले, दरिबा बंडगर, पांडूरंग कोरे, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, बुथ कमिटय़ांचे अध्यक्ष उपस्थित होते.

 

Related posts: