|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोड्डीत दरोडेखोरांचा धुमाकूळ

सोड्डीत दरोडेखोरांचा धुमाकूळ 

प्रतिनिधी/ मंगळवेढा

तालुक्याच्या दक्षिण भागात सीमावर्ती ठिकाणी असलेल्या सोड्डी येथे गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. सोन्याचे दागिने हिसकावून घेण्यास विरोध केला म्हणून कस्तुरबाई रामण्णा बिराजदार (वय 60) या महिलेचा खून केला. तर मलकाप्पा रेवगोंडा बिराजदार (वय 60) हे मारहाणीत गंभीर जखमी आहेत.

याबाबत अशी माहिती की, गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता  फिर्यादीची आई कस्तुराबाई बिराजदार वय (60) व चुलत काका शिवलिंगप्पा बिराजदार घरात झोपले असताना घरात कोणीतरी चोरटय़ाने घराच्या दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला.

याचवेळी गळ्यातील सोन्याचा सर अर्धा तोळा अंदाजे किंमत पंधरा हजार चोरटय़ांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताच कस्तुराबाई यांनी त्यास विरोध केला म्हणून त्यांच्या छातीवर, पाठीवर डावे बाजुस अज्ञात हत्याराने वार केले. यामध्ये कस्तुराबाई बिराजदार यांचा जागीच मृत्यू झाला तर याचवेळी झालेल्या चोरांबरोबरच्या झटापटीत मलक्काप्पा रेवगुंडा बिराजदार यांनाही चोरटय़ांनी मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी अन्य दोन ठिकाणीही घरफोडी केली असून या प्रकरणाने परिसरात घबराट पसरली आहे.

जखमींना उपचारासाठी जत येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी भेट दिली. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख वीरेश प्रभू हेही घटनास्थळी दाखल झाले होते.

या गावातील बहुसंख्य लोक उपजीविकेसाठी सांगली व कोल्हापूर भागात ऊसतोडणीसाठी गेले असून गावात वयोवृध्द महिला आहेत. त्याचबरोबर हे गाव कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने दरोडेखोरांना चोरी करुन कर्नाटकाचा आसरा घेणे शक्य होते. त्यामुळे चोरटय़ांनी एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी केली व ते पसार झाले आहेत. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून त्यांनी दरोडेखोराचा तपास सुरू केला आहे.

गाव दोन राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून चोरांच्या तपासकामी माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करत पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे करत आहेत.

Related posts: