|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मन मोकळे करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून पहा

मन मोकळे करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून पहा 

डॉ. राजेंद्र बर्वे यांचे विचार, म्हापसा येथे मंथन व्याख्यानमाला

प्रतिनिधी/ म्हापसा

आपल्या मनाचे प्रश्न सोडविण्यासाठी जरा थांबा, स्थिर व्हा व आपल्या मनाची तयारी करा. शांतपणे बसल्याने जे नकारात्मक विचार निघून सकारात्मक विचार येण्यास मन मोकळे होते. तसेच सकारात्मक विचार पाहिल्यास तुमचे विकारही आपोआप निघून जातात, असे विचार मानसोपचार तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी मांडले. लोकमित्रमंडळ म्हापसा आयोजित 8 व्या मंथन व्याख्यानमालेत ते बोलत होते.

महारुद्र संस्थेचे अध्यक्ष अमर कवळेकर यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून मंथम व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य अनिल सामंत, अध्यक्ष प्रशांत बर्वे, सचिव वल्लभ केळकर, संयोजक अविनाश बेळेकर, तिन्हईकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

गुरुच्या चरणी बसा आणि गुरुंना प्रश्न विचारा. जी गोष्ट करायची आहे, त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण मी का करतो यावर थांबून विचार करा. स्वत:ला गांभीर्याने विचारा, यातूनच विचार निर्माण होईल. प्रत्येकाने शांतपणे बसणे गरजेचे आहे. आपल्या जीवनाचा सर्व प्रथम अनुभव श्वासात जोडलेला असतो. शांतपणे पहात राहिल्यास सर्व प्रश्न सुटतात, असे बर्वे म्हणाले.

नव्या विज्ञानाने आम्हाला खुप काही दिले. मात्र त्यावर आपण विश्वास ठेवत नाही. विज्ञानाने 50 ते 60 वर्षात खूप प्रयत्न, प्रयोग केले आहेत. रोज 20 मीनिटे जर तुम्ही शांत बसला तर कमीत कमी वेळात तुम्हाला फायदा होईल. यात केवळ तुमचे मनच नाहीतर मेंदूची वाढ होईल व नवीन संशोधन व्हायला लागेल, असेही बर्वे यांनी सांगितले.

शांतपणे बसल्यास नकारात्मक विचार निघून जाऊन सकारात्मक विचार येतात. आपण सर्व गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहायला पाहिजे. जेणेकरून तुमचे विकार आपोआप निघून जातील. एकाग्रता खूप आवश्यक आहे. शांतता राखा, भीती दूर करा. जेणेकरून आम्ही चांगले जीवन जगू शकतो. स्वत:च्या मनावर विश्वास ठेवा व मन स्थिर व शांत ठेवून जगायला शिका असे डॉ. बर्वे म्हणाले.

आज शनिवार दि. 10 रोजी संध्याकाळी 6.30 वा. द्वितीय पुष्प मध्ये ‘भारत एक ज्ञानाचा खजिना’ यावर प्रशांत पोळ व्याख्यान देणार आहेत.