|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कार्निव्हल : अन्न व सांस्कृतिक महोत्सवाचे शानदार उद्घाटन

कार्निव्हल : अन्न व सांस्कृतिक महोत्सवाचे शानदार उद्घाटन 

प्रतिनिधी/ पणजी

कार्निव्हल निमित्ताने पणजी-कांपाल येथे पर्यटन खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अन्न-सांस्कृतिक महोत्सवाचे मोठय़ा धूम धडय़ाक्यात उद्घाटन झाले. दयानंद  बांदोडकर मैदानावर हा महोत्सव सुरु झाला असून तो 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. गोव्यातील पर्यटन वाढीसाठी रु. 200 कोटी केंद्राने मंजूर केले असून समुद्रकिनाऱयांच्या सफाईची निविदा लवकरच जारी करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी दिली. पर्यटन व पर्यटक वाढीसाठी कार्निव्हल आखण्यात आला असून पर्यटकांनी गोव्याच्या जनतेने चिंतामुक्त होऊन मजा लुटावी असा हेतू त्यामगे आहे. कार्निव्हल हि आमची संस्कृती नसली तरी पर्यटकांसाठी-लोकांसाठी त्याचे आयोजन केले जाते असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्री. आजगांवकर यांनी आमदार व पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल तसेच पणजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या उपस्थितीत लाल फित कापून महोत्सवाचे उद्घाटन केले. त्यावेळी प्रवेशद्वारावर व आकाशात फटाक्यांचा पाऊस पडला तसेच दारुकामाची आतषबाजी करण्यात आली. महोत्सवात विविध खास पदार्थाचे 50 हून अधिक स्टॉल्स असून त्यांची त्यांनी फिरुन पहाणी केली. त्यानंतर श्री. आजगांवकर यांनी महोत्सवाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करुन लोकांनी खाऊन-पिऊन आनंद लुटावा असे आवाहन केले.

गोव्यात जास्तीत जास्त पर्यटक यावेत असा प्रयत्न चालु असून कार्निव्हल हा त्याचाच एक भाग आहे. समुद्रकिनाऱयावर चांगले पर्यटक यावेत आणि त्यांना फेरीवाले, भिकारी व इतरांचा त्रास होऊ नये तसेच त्यांची सुरक्षा अबाधित रहावी म्हणून सरकार सर्व ती उपाययोजना करीत आहे. समुद्रकिनारी सीसीटिव्ही लावण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ती टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचे श्री. आजगांवकर यांनी स्पष्ट केले. गोव्याची संस्कृती पर्यटकांनी अबाधित राखावी. नको ते उद्योग त्यांनी किनारी करु नयेत. अशा पर्यटकांना खपवून घेतले जाणार नाही असेही श्री. आजगांवकर यांनी सुनावले. महोत्सवात विविध प्रकारचे गीत-संगीत मय तसेच डिजे-बँन्ड वादनाचे अनेक कार्यक्रम संध्याकाळी 6 नंतर रात्री 10 पर्यंत होणार असून ते सर्वांसाठी खुले आहेत.

Related posts: