|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे रुग्णाचा मृत्यू

डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे रुग्णाचा मृत्यू 

नातेवाईकांचा आरोप : कर्नाटक रक्षण वेदिकेकडून धरणे

वार्ताहर / घटप्रभा

डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे वयस्कर रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे डॉक्टरांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी इस्पितळ आवारात धरणे आंदोलन केले. यानंतर इस्पितळाच्या प्रमुख वैद्याधिकाऱयांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. मृत रुग्णाचे नाव हनुमंत नाव्ही (वय 60, रा. धुपदाळ, ता. गोकाक) असे आहे.

याबाबतची माहिती अशी की, घटप्रभा येथील कर्नाटक आरोग्य धाम इस्पितळात उपचारासाठी दाखल केलेल्या हनुमंत नाव्ही यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. यावेळी वॉर्डातील डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरित उपचार न केल्याने हनुमंत यांचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. ही घटना समजताच घटप्रभा व गोकाक येथील कर्नाटक रक्षण वेदिकेचे तालुका अध्यक्ष बसवराज खानप्पन्नवर यांच्या नेतृत्वाखाली इस्पितळाच्या आवारात धरणे आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच घटप्रभा व गोकाक पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी मृत रुग्णाचे नातेवाईक व कर्नाटक नवनिर्माण वेदिकेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले.

याप्रकरणी कर्नाटक आरोग्य धाम इस्पितळाचे प्रमुख वैद्याधिकारी डॉ. जी. एम. वैद्य यांनी झालेल्या घटनेप्रकरणी तीव्र दु:ख व्यक्त करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

Related posts: