|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतीय पत्रकाराला मालदीव सोडण्याचा आदेश

भारतीय पत्रकाराला मालदीव सोडण्याचा आदेश 

दोन्ही पत्रकारांची सुटका : मालदीवमधील संकट तीव्र, वृत्तवाहिनीचे प्रसारण रोखले

वृत्तसंस्था/ माले

मालदीवमध्ये कार्यरत असलेल्या दोन्ही विदेशी पत्रकारांना यामीन सरकारने देश सोडण्याचा आदेश दिला आहे. यात एक पत्रकार भारतीय नागरिक असून दुसरा भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे. दोन्ही पत्रकारांना मालदीवच्या सैन्याने ताब्यात घेतले होते. दोघेही मालदीवच्या राजनयिक संकटाचे वृत्तांकन करत होते. सरकारने या वृत्तांकनाला अवैध कृत्य मानत त्यांना अटक केली होती.

अटक करण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये अमृतसरचे रहिवासी मनी शर्मा सामील असून दुसऱया पत्रकाराचे नाव आतिश पटेल आहे. दोन्ही पत्रकार पर्यटक व्हिसावर मालदीवमध्ये वृत्तांकन करत होते, असा आरोप तेथील पोलिसांनी केला आहे. आता दोन्ही पत्रकारांना स्थलांतर विभागाच्या अधिकाऱयांच्या हवाली करण्यात आले आहे. दोघांनाही तत्काळ मालदीव सोडण्याचा आदेश देण्यात आला. त्यांच्याविरोधात अन्य कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नसल्याचे समजते.

या अगोदर राजे टीव्ही नावाच्या खासगी वृत्तवाहिनीचे प्रसारण सरकारने रोखले होते. या वाहिनीवर विरोधकांच्या हालचाली आणि विधानांना प्राधान्य देण्याचा आरोप होता. सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्रपतींसमवेत 9 राजकीय कैद्यांवर ठेवण्यात आलेले आरोप चुकीचे ठरवत त्यांच्या सुटकेचा आदेश मागील आठवडय़ात दिला होता. यानंतरच तेथील संकट सुरू झाले आहे.

सत्तारुढ अब्दुल्ला यामीन यांच्या सरकारने हा आदेश मानण्यास नकार देत देशात आणीबाणी लागू केली होती. त्याचबरोबर आदेश देणारे सरन्यायाधीश अब्दुल्ला सईद आणि अन्य एका न्यायाधीशाला अटक करण्यात आली. माजी राष्ट्रपती मामून अब्दुल गयूम समवेत अनेक विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली आहे.

यामीन यांच्या कार्यकाळात दुसऱयांदा आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.  नोव्हेंबर 2015 मध्ये त्यांनी स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगत आणीबाणी लादली होती. मालदीवच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यामीन यांच्याविरोधात भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची मागणी केली आहे.