|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » …तर राज्यातील 22 हजार सोसायटय़ांना फटका

…तर राज्यातील 22 हजार सोसायटय़ांना फटका 

प्रतिनिधी/ तासगाव

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकऱयांच्या सहा महिन्याच्या व्याजाचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही रक्कम शासनाकडून मिळणार नाही, तसेच शेतकऱयांकडून वसूल करायची नाही असे शासनाने स्पष्ट केल्यामुळे विकास सोसायटय़ांनी कोठून हे पैसे भरावयाचे असा सवाल उपस्थित होत आहे. तर कोटय़वधी रूपयांच्या व्याजाची रक्कम शासनाने द्यावी असे स्पष्ट करून तसे न झाल्यास राज्यातील सुमारे 22 हजार सोसायटय़ांना सुमारे 75 कोटीचा मोठा फटका बसेल. परिणामी सोसायटय़ा बंदही पडतील असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी गटसचिव संघटनेचे राज्य अध्यक्ष अर्जून (बापू) पाटील यांनी व्यक्त केले आहे. तर जिह्यातील 763 विकास सोसायटय़ांना सुमारे आठ कोटीचा फटका बसणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत सांगली जिह्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेकडील 24 हजार 265 शेतकऱयांना 93 कोटी 63 लागा 89 हजार 134 रूपयांचा लाभ झाला आहे. ही रक्कम शेतकऱयांच्या खात्यावर जमा झाली आहे. तसेच या चार टप्प्यानंतरची यलो लिस्ट, मिस मॅच-1 व मिस मॅच-2 यादीतील शेतकऱयांची पात्र यादी प्रसिद्ध व्हायची आहे. तद्नंतर कर्जमाफीची रक्कम येणार आहे.

चार टप्प्यात सांगली जिह्यातील दहा तालुक्यातील 763 विकास सोसायटय़ासाठी 93.64 कोटीची कर्जमाफी मिळालेली असून 1 ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2018 या सहा महिन्यातील व्याजाची रक्कम सुमारे 5 कोटी 85 लाख रूपये होत आहे. याशिवाय यलो लिस्ट, मिस मॅच-1 व मिस मॅच -2 यादीतील पात्र शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या रक्कमेवर ही व्याज लागू होणार असून असे एकूण सुमारे 9 कोटी रूपये होईल असे दिसून येत आहे. तर याची विशेष झळ दुष्काळी तासगाव, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर तालुक्यातील सर्व विकास सोसायटय़ाना बसणार आहे.

तर कर्जमाफी खात्यावर व्याज आकारणी करायची नाही, केल्यास सबंधित बँकावर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. असे असले तरी बँकाची कर्जवाटप, व्याज व मुद्दल वसुलीची पद्धत पाहता जिल्हा बँका विकास सोसायटय़ाना व्याज सोडणार नाहीत असेच दिसून येत आहे. तसेच सोसायटय़ानी सभासदाकडून व्याज वसूल करायचे नाही असे ही स्पष्ट करण्यात आल्याने सोसायटय़ानी बँकेतील व्याज कसे भरायचे असा सवाल उपस्थित होत असून तसे झाल्यास राज्यातील सुमारे 22 हजार सोसायटय़ाना याचा फटका बसून या सोसायटय़ा बंद पडतील असेच दिसून येत आहे.

मोठा फटका शक्य : अर्जून पाटील

याबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य सहकारी गटसचिव संघटनेचे राज्य अध्यक्ष अर्जून (बापू) पाटील म्हणाले, ज्यांना कर्जमाफी दिलेली आहे, त्यांच्या खात्यावर 1 ऑगस्ट 2017 नंतरचे सहा महिन्याचे व्याज बँका संबंधित विकास सोसायटय़ाच्या खात्यावर येणे दाखवतील. हे सोसायटय़ांना सहन न होणारे आहे. शासनाने कोटय़वधी रूपयांच्या या व्याजाची रक्कम द्यावी. तसे न झाल्यास राज्यातील 22 हजार सोसायटय़ांना सुमारे 75 कोटीचा फटका बसेल. या सोसायटय़ा तोटय़ात जातील, व्यस्त तफावतीत जातील, परिणामी सोसायटय़ा बंदही पडतील असे स्पष्ट करून सोसायटय़ा ग्रामीण भागातील शेतकऱयांचा कणा असून या सोसायटय़ांना तोटय़ात ढकलू नये असेही त्यांनी स्पष्ट केले.