|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पूल खचल्याच्या अफवेने घबराट

पूल खचल्याच्या अफवेने घबराट 

भोस्ते-जगबुडी पूलाची तांब्याची पट्टी गायब

यंत्रणांची उडाली तारांबळ,

डागडुजी सुरू,अवजड वाहतूक बंद

प्रतिनिधी /खेड

मुंबई-गोवा महामार्गासाठी पर्यायी मार्ग असलेला भोस्ते-जगबुडी पूल खचल्याच्या अफवेने सोमवारी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याबाबतची माहिती मिळताच विविध खात्यांचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पुलाच्या एका बाजूची तांब्याची पट्टी गायब होऊन काहीशी पोकशी निर्माण झाल्याचे लक्षात येताच यंत्रणांनी काहीसा निःश्वास टाकला. पुलाच्या एका टोकाला निर्माण झालेल्या पोकळीत तांब्याची पट्टी बसवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान पुलाला कोणाताही धोका नसल्याचा निर्वाळा बांधकाम विभागाने दिला आहे.

महामार्गावर दुर्घटना घडल्यास भोस्ते-जगबुडी पुलाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर केला जातो. कोंडिवली, शिव, आष्टी, वेरळ, भोस्ते आदी गावांसह अन्य गावांतील ग्रामस्थ याच पुलावरून शहरात बाजाररहाटसाठी येत असतात. याशिवाय वाहनांचीही याच पुलावरून सतत रेलचेल सुरू असते. विशेषतः रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी या पुलाचा रिक्षा व्यावसायिक अधिक वापर करतात. सोमवारी नेहमीप्रमाणे या पुलावरून रिक्षा व्यावसायिकांची वर्दळ सुरू असतानाच पुलाच्या एका बाजूला पोकळी निर्माण झाल्याचे दृष्टीस पडले. ही बाब कर्णोपकर्णी होत पूल खचल्याची अफवा पसरली.

याबाबत माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, जि. प. बांधकाम खात्याचे अधिकारी, पोलीस यंत्रणांसह अन्य यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आमदार संजय कदम यांनीही घटनास्थळी भेट देत अधिकाऱयांना सूचना केल्या. खबरदारीचा उपाय म्हणून सुरूवातीला काही वेळ पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. पुलाच्या एका बाजूला निर्माण झालेल्या पोकळीची संबंधित अधिकाऱयांनी सखोल पहाणी केली असता या भागातील तांब्याची पट्टी गायब असल्याचे दृष्टीस पडले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंना बॅरिगेटस् लावून एकेरी वाहतुकीचा अवलंब करण्यात आला. पोकळी निर्माण झालेल्या ठिकाणी तांब्याची पट्टी टाकण्याचे काम दुपारच्या सुमारास हाती घेण्यात आले. या मार्गावरून धावणाऱया अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पुलास कोणत्याहीप्रकारचा धोका नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बांधकाम खात्याने केले आहे.

हा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित होता. मात्र त्यानंतर हा पूल जि. प. बांधकाम खात्याकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. या पुलाची उर्वरित प्रलंबित राहिलेली कामेही तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे येथील जि. प.चे बांधकाम उपअभियंता एम. बी. खेडेकर यांनी सांगितले.

भोस्ते-जगबुडी पूल वाहतुकीसाठी डेंजरच?

भोस्ते-जगबुडी पूल वाहतुकीसाठी डेंजरच असून यापूर्वीही पुलाची डागडुजी ऐरणीवर आली होती. या पर्यायी पुलावरून रात्रीच्या सुमारास अवजड वाहनांची विशेषतः वाळूची वाहतूक सुरू असते. याशिवाय पुलाच्या शेवटच्या टोकाकडील भाग खचत चालला असून वाहने हाकताना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. पुलाच्या मध्यभागी ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. मात्र तरीही पुलाच्या डागडुजीसाठी बांधकाम खात्यास अद्याप सवड मिळालेली नाही.

Related posts: