|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आडाळी एमआयडीसी पालकमंत्र्यांमुळे रखडली!

आडाळी एमआयडीसी पालकमंत्र्यांमुळे रखडली! 

जि.प.माजी सभापती अंकुश जाधव यांचा आरोप

प्रतिनिधी / दोडामार्ग:

दोडामार्ग व बांदा दशक्रोशीतील जनतेचा रोजीरोटीचा प्रश्न सुटावा, म्हणून तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील आडाळी येथे एमआयडीसी मंजूर झाली होती. अन्य प्रकल्पाबाबत जिल्हय़ात मत-मतातंरे, आरोप, विरोध झाले. मात्र, तालुक्यातील जनतेला रोजगाराचे महत्त्व पटवून देऊन आम्ही तो प्रकल्प येथे आणला. येथील जनतेसाठी माजी मुख्यमंत्री राणे यांनी रोजगाराचा पाया रचला. त्यावर कळस चढविण्याचे नाममात्र काम हे विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून होणे अपेक्षित व क्रमप्राप्त होते. मात्र, केसरकर यांनी या प्रकल्पाकडे राजकीय श्रेयवादातून पाहिल्याने ‘जैसे थे’ आहे. याला केवळ केसरकर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई हे जबाबदार असल्याचे मत माजी समाजकल्याण सभापती तथा विद्यमान जि. प. सदस्य अंकुश जाधव यांनी  व्यक्त केले.

 ‘तरुण भारत’मध्ये आडाळी एमआयडीसीबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, तत्कालीन पालकमंत्री राणे यांच्याकडे आम्ही तालुक्यात एमआयडीसी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले. त्यांच्या मागणीनुसार बाजारभावापेक्षा अधिक भावाने जमीन मोबदला देण्यात आला. जिल्हय़ात अन्य ठिकाणी प्रकल्प विरोध होत असताना आडाळी व तालुक्यातून विरोध झाला नाही. कारण स्थानिकांना रोजगाराची भावना होती. येथे मोठे प्रकल्प, कारखाने येऊन उद्योग व्यवसायाला चालना मिळेल, शैक्षणिक पात्रतेतून रोजगार मिळेल, अशी अपेक्षा सर्वांचीच आहे. मात्र, याकडे पालकमंत्री केसरकर यांनी लक्ष न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.  केसरकर यांनी माटणे येथे मिनी एमआयडीसी आणू, असे गाजर सत्ताधारी आमदार असताना दाखविले होते. पण, आज आडाळीतील एमआयडीसीची राणे यांनी मुहूर्तमेढ रोवली, त्याला मूर्तरुप द्यावयाचे केसरकर यांचे काम आहे. रोजगाराच्या प्रश्नी कोणतेही राजकारण व श्रेयवाद न आणता हा प्रकल्प केसरकर व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मूर्त स्वरुपात आणावा, असे आवाहन अंकुश जाधव यांनी केले आहे.

Related posts: