|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोनाळ येथील महिलांची पोलीस स्थानकात धडक

कोनाळ येथील महिलांची पोलीस स्थानकात धडक 

दारू विक्री न थांबल्यास 21 रोजी मोर्चा

प्रतिनिधी / दोडामार्ग:

कोनाळ ग्रामपंचायत हद्द सोडून दारू व्यावसायिक पुन्हा अवैधरित्या दारू विक्री करीत आहेत. त्यामुळे संतप्त महिलांनी सोमवारी पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील घासे यांच्याशी चर्चा केली. अशीच परिस्थिती राहिल्यास 21 फेब्रुवारीला पोलीस ठाण्यावर महिला धडक मोर्चा नेतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी विनीता घाडी, मनाली शेलार, रुपाली धुरी, शारदा जाधव, अश्विनी घोटगेकर, सुप्रिया जाधव, वैशाली जाधव, संध्या नाईक, विनया आचरेकर, कलिप्त सावंत यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

यावेळी चर्चा करताना महिलांनी अशाप्रकारे अवैध पद्धतीने दारू विक्री सुरू आहे. याचा पाढा पोलीस निरीक्षकांसमोर वाचला. कोनाळ हद्दीत सुरुवातीला दारू धंदे बंद करा, यासाठी महिला आक्रमक झाल्या. त्यामुळे दारू व्यावसायिक कोनाळ रद्द सोडून वेशीवर दारू विक्री करतात. मात्र, पोलीस त्याकडे डोळेझाक करतात. याकडे महिलांनी लक्ष वेधले.

..तर कायदा हातात घेऊ !

यावेळी पोलीस निरीक्षक घासे यांना महिलांनी आपण कायदा हातात घेऊ, असे सांगितले. आपण यापूर्वी दारू पकडून दिली. मात्र, दारू पोहोचतेच कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे दारू विक्री झाल्यास त्याठिकाणी दारुच्या बाटल्या फोडू, मग कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलीस जबाबदार असतील, असेही महिलांनी सांगितले.

21 फेबुवारीला मोर्चा !

कोनाळ येथील महिला व ग्रामस्थांनी यापूर्वी सविस्तर दारू अड्डय़ांची माहिती पोलिसांना दिली. त्यावर फक्त जुजबी कारवाई झाली. त्यामुळे दारू व्यावसायिक धजत नाहीत. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास 21 फेब्रुवारीला मोर्चा पोलीस ठाण्यावर येईल, असे महिलांनी बेधडक सांगितले.

महिलांच्या मागणी सोबत पोलीस-घासे

तुमची मागणी रास्त आहे. जर छुप्या पद्धतीने दारू विक्री होत असेल तर निश्चित कारवाई करू, असे आश्वासन पोलीस निरीक्षक घासे यांनी महिलांना दिले.