|Friday, August 17, 2018
You are here: Home » क्रिडा » भारत पुन्हा ऐतिहासिक मालिकाविजयाच्या उंबरठय़ावर

भारत पुन्हा ऐतिहासिक मालिकाविजयाच्या उंबरठय़ावर 

यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज पोर्ट एलिझाबेथवर पाचवी वनडे

वृत्तसंस्था/ पोर्ट एलिझाबेथ

दक्षिण आफ्रिकन आव्हानाला आणखी संजीवनी लाभण्याआधीच भारतीय संघ आज (दि. 13) येथील पाचव्या वनडे सामन्याच्या माध्यमातून आफ्रिकन भूमीतील आपला पहिलावहिला, ऐतिहासिक वनडे मालिकाविजय संपादन करण्यासाठी पुढे सरसावेल, अशी तमाम क्रीडारसिकांची अपेक्षा असेल. यापूर्वी, चौथ्या वनडेत भारताला जोहान्सबर्गवर फटका बसला. पण, इथे चित्र बदलेल, ही अपेक्षा साहजिक असणार आहे. दिवस-रात्र चालणाऱया या लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 4.30 वाजता सुरुवात होईल.

6 वनडे सामन्यांच्या या मालिकेवर आपली मोहोर उमटवण्यासाठी भारताकडे आणखी 2 सामने असतील. पण, येथेच मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करता आले तर विराटसेनेला ही ऐतिहासिक संधी साधण्यासाठी शेवटच्या वनडेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही, हे सुस्पष्ट आहे. भारतीय संघ या मालिकेत सध्याच्या घडीला 3-1 फरकाने आघाडीवर असून मालिकेत आणखी दोन सामने बाकी आहेत.

उभय संघांत आणखी जुगलबंदीची अपेक्षा

भारताने या मालिकेत दरबान येथील पहिली वनडे 6 गडी राखून, सेंच्युरियनची दुसरी वनडे 9 गडी राखून तर केपटाऊनची तिसरी वनडे थोडय़ाथोडक्या नव्हे तर तब्बल 124 धावांनी जिंकली होती. पण, त्यानंतर पावसाने व्यत्यय आलेल्या जोहान्सबर्गमधील चौथ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेने 5 गडी राखून बाजी परतवली व सलग पराभवांची मालिका खंडित करत मालिकेतील आपले अस्तित्वही कायम राखले. त्या पार्श्वभूमीवर, उभय संघांत येथे आणखी जुगलबंदी अपेक्षित आहे.

यापूर्वी, चौथ्या वनडेला षटकांची कपात झाल्याने जणू टी-20 चे स्वरुप आले. पण, एबी डिव्हिलियर्स स्वस्तात बाद झाल्यानंतर देखील डेव्हिड मिलर व हेनरिच क्लासेन यांनी चहल व कुलदीप या मनगटी फिरकीपटूंवर जोरदार हल्ले चढवत अक्षरशः सामना भारताच्या तोंडातून हिसकावून घेतला. श्रेयस अय्यरने दिलेले सोपे जीवदान व मिलर त्रिफळाचीत झाला असताना चहलचा तो चेंडू नोबॉल असणे अर्थातच महागडे ठरले. आता भारताला मालिकाविजय संपादन करायचा असेल तर सर्वप्रथम अशा किरकोळ चुका कोणत्याही परिस्थितीत टाळाव्याच लागणार आहेत.

केदार जाधवच्या उपलब्धतेबाबत साशंकता

केपटाऊनमध्ये धोंडशिरेच्या दुखापतीने जायबंदी झालेला केदार जाधव अद्याप सावरलेला नसून यापूर्वी जोहान्सबर्गमध्ये चौथ्या लढतीतही तो खेळू शकला नव्हता. केदारची संथ गोलंदाजीवर बऱयापैकी हुकूमत असून चहल व यादव यांच्यासमवेत तो पूरक गोलंदाजी साकारु शकतो. श्रेयस अय्यर लेगबेक गोलंदाजी करु शकतो. यापूर्वी लंकेविरुद्ध पदार्पणाच्या मालिकेत त्याने गोलंदाजी केली होती. याशिवाय, स्वतः विराट मध्यमगती शैलीने गोलंदाजी करु शकतो. अर्थात, केदार जाधव दुखापतग्रस्त असल्याने भारताला फलंदाज या नात्याने नव्हे तर मंदगती गोलंदाज या नात्याने त्याची उणीव येथे अधिक जाणवली आहे.

रोहितच्या 4 डावात जेमतेम 40 धावा

अजिंक्य रहाणेने चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरताना 79 धावांनंतर 11 व 8 अशा किरकोळ धावा जमवल्या आहेत. पंडय़ाला देखील शेवटच्या दोन डावात 14 व 9 अशा जेमतेम धावांवर समाधान मानावे लागले आहे. जोहान्सबर्गमध्ये केवळ धोनीमुळेच (43 चेंडूत नाबाद 42 धावा) भारताला थोडीफार प्रतिष्ठा राखता आली होती, ही वस्तुस्थिती आहे. पहिल्या 4 वनडेत केवळ 40 धावा जमवणाऱया रोहित शर्माचा खराब फॉर्म आताही चिंतेचाच विषय ठरला आहे.

विराट कोहली (393 धावा) व शिखर धवन (271 धावा) यांनी उर्वरित सर्व फलंदाजांच्या (239) तुलनेत एकत्रित जवळपास तिप्पटच्या आसपास धावा जमवल्या असून या दोघांचा अपवाद वगळता अन्य सर्वांचा खराब फॉर्म अर्थातच चिंताजनक आहे. हीच बाब हेरत आफ्रिकन गोलंदाज येथे प्रामुख्याने विराट कोहली व शिखर धवन यांना रोखण्यासाठी गेमप्लॅन आखत असतील तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल. या पाचव्या वनडेत आफ्रिकन संघात काही बदल होणार का, हे ही पहावे लागेल. यापूर्वी त्यांनी पूर्णवेळ फिरकीपटू इम्रान ताहीरला वगळत केवळ जेपी डय़ुमिनीवर अवलंबून राहणे पसंत केले होते.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर.

दक्षिण आफ्रिका : एडन मॅरक्रम (कर्णधार), हाशिम आमला, जेपी डय़ुमिनी, इम्रान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्कल, ख्रिस मॉरिस, लुंगी एन्गिडी, अँदिले पेहलुकवायो, कॅगिसो रबाडा, तबरेझ शमसी, झोन्डो, फरहान बेहार्दिन, हेनरिच क्लासेन (यष्टीरक्षक), एबी डिव्हिलियर्स.

सामन्याची वेळ : 4.30 वा.

विराटसेना प्रतिकूल इतिहास बदलण्याची हिंमत दाखवणार का?

आजचा सामना सेंट जॉर्ज पार्कवर होत असून येथील इतिहास भारतासाठी प्रतिकूल ठरत आला, ही वस्तुस्थिती आहे. भारताने 1992 पासून आजवर येथे 5 वनडे खेळले असून प्रत्येक वेळी संघाच्या पदरी पराजयच आले आहेत. चारवेळा दक्षिण आफ्रिकेने येथे भारतीय संघाला चीत केले तर एकदा केनियाने देखील आपल्याला नमवण्याचा पराक्रम याच मैदानावर गाजवला आहे. 2001-02 मध्ये तिरंगी मालिकेत भारताला त्यांच्याकडून धक्का सोसावा लागला होता. केवळ यजमान संघाचा विचार करता त्यांनी या मैदानात आजवर 32 सामने खेळले असून त्यात फक्त 11 वेळाच पराभव स्वीकारले आहेत. एरवी, मंदगती, फिरकी गोलंदाजीला पोषक ठरत आलेल्या पोर्ट एलिझाबेथवरील 5 वनडेमध्ये भारताला आजवर एकदाही अगदी 200 धावांचा टप्पाही गाठता आलेला नाही, ही देखील आणखी एक कटू वस्तुस्थिती. हा सर्व प्रतिकूल इतिहास बदलण्यासाठी आपला संघ जरुर सक्षम आहे. पण, यासाठी आपले खेळाडू या मैदानावर योग्यवेळी, योग्य ठिकाणी आपला खेळ उंचावण्याची हिंमत दाखवणार का, हे पहावे लागेल.

 

Related posts: