|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला भाजपकडूनच केराची टोपली

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला भाजपकडूनच केराची टोपली 

 

प्रतिनिधीसोलापूर

महापालिकेत आपसात वाद न करता एकत्र काम करावे, अन्यथा पालिका बरखास्त करु अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी देवून महिन्याचाही कालावधी लोटला नसतानाच सोमवारी पालिका सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपमध्ये पुन्हा वाद दिसल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला भाजपकडूनच केराची टोपली दाखविण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात सातत्याने होत असलेल्या पक्षातंर्गत वादामुळे शिस्तीच्या भाजपची अब्रू चव्हाटय़ावर येत पक्षाचे हसू झाले आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता येवून एक वर्षाचा कालावधी होत आला आहे. भाजपची पालिकेत स्वीकृतसह 51 नगरसेवकांसह बहुमतात सत्ता आहे. परंतु 51 नगरसेवकांची गटातटात विभागणी होवून 35 नगरसेवक पालकमंत्री तर 16 नगरसेवक सहकारमंत्री गटात विभागलेले आहेत. या दोन गटात गेल्या वर्षभरात विस्तूआड गेला नसून सातत्याने वाद व कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. पक्षातंर्गत वाद इतका शिगेला गेला की संपूर्ण महाराष्ट्रात भाजपमधील वादाची चर्चा रंगू लागली आहे. नगरसेवकच नव्हे तर भाजपचे दोन मंत्री आणि खासदार देखील आपसात भांडत असल्याचे सर्वश्रृत झालेले आहे.

भाजपातील वाद विकोपाला गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महिन्यापूर्वी दोन्ही मंत्री व नगरसेवकांना मुंबईत वर्षा बंगल्यावर बोलवून सज्जड दम देत आपसातील वाद मिटवा अन्यथा महापालिकाच बरखास्त करु, अशी तंबी दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला तरी भाजप नगरसेवक मान देत वाद थांबवतील, असे वाटत होते. परंतु सोमवार, 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रभारी सभागृहनेता कोण यावरुन सत्ताधारी भाजपमध्ये पुन्हा वाद पेटला. पालकमंत्र्यांच्या आदेशाने नगरसेवक श्रीनिवास रिकमल्ले सभागृहात उपसूचना वाचन करीत असतानाच महापौरांनी डायसवरुन नागेश वल्याळ यांना उपसूचना वाचनाचे आदेश दिले. सर्वसाधारण सभेत भाजपचे दोन सभागृहनेते उपसूचना वाचत असल्याने सभेमध्ये एकच गोंधळ उडाला. पालकमंत्री गटाचे नगरसेवक सभागृहाबाहेर पडले. विशेष म्हणजे महापौरांशेजारी बसलेल्या उपमहापौर देखील सभागृहातून बाहेर पडल्या.

महापौर शोभा बनशेट्टी यांनी विषय पत्रिकेवरील काही विषय बहुमताने, काही विषय दुरुस्तीसह एकमताने तर सोलापूरच्या नामकरणाचा विषय दफ्तरी दाखल करण्यास डायसवरुन मान्यता देत सभेचे कामकाज थांबवले आणि त्यांनी सभागृह सोडले. महापौरांपाठोपाठ काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी, एमआयएमच्या गटनेत्यांनी एकत्रित महापौरांचे कक्ष गाठत विकासाच्या मुद्यावर आम्ही आपल्या सोबत असल्याचे सांगत शहर विकासासाठी तरी सभागृहाचे कामकाज चालवा, असे सांगितले.

काँग्रेसचे चेतन नरोटे म्हणाले, वर्षापासून महापालिकेचा कारभार ठप्प असून सत्ताधारी भाजप असेच अंतर्गत वादात शहराचे नुकसान करणार असेल तर महापालिका बरखास्त करण्याचा ठराव आम्हीच सर्व विरोधी पक्ष मिळून मुख्यमंत्र्यांना देवू. बसपाचे आनंद चंदनशिवे, एमआयएमचे तौफिक शेख, राष्ट्रवादीचे किसन जाधव, श्रीदेवी फुलारी, रियाज खैरदी यांनीही सभेचे कामकाज चालविण्याचे महापौरांना साकडे घातले.

   पार्टी मिटींगमध्ये प्रभारी नाव नाही ठरले : महापौर बनशेट्टी

सर्वसाधारण सभेपूर्वी पक्षाची बैठक झाली, परंतु सर्वसाधारण सभेत प्रभारी सभागृहनेता कोण असणार, याबाबत काहीच ठरले नाही. सभागृहनेता नाव कळविण्याबाबत आपण मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री, सहकारमंत्री यांना पत्राद्वारे कळवले, पण काहीच निर्णय कळविण्यात आला नाही. त्यामुळे आजच्या सभेपुरते नागेश वल्याळ यांना विषय वाचण्यास सांगितल्याचे महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितले.

  रिकमल्लेंचे नाव पालकमंत्र्यांनी सांगितले : जामगुंडे

सोमवारच्या सर्वसाधारण सभेसाठी प्रभारी सभागृहनेता म्हणून श्रीनिवास रिकमल्ले यांचे नाव पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्थायी सभापती संजय कोळी यांना सांगितले होते. त्यानुसार त्यांना सभेत विषय वाचण्यास सांगितले. पक्षातील घडामोडींबाबत वरिष्ठांनीच निर्णय घ्यावयाचा असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी सांगितले.

Related posts: