|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल माफ करा

वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल माफ करा 

प्रतिनिधी/ कराड

इस्लामपूर येथे आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे, मंत्री महादेव जानकर यांचे सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजता मुंबईहून कराड विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. मंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासह मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कराड दक्षिणमध्ये शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉ. अतुल भोसले यांनी वाकुर्डे योजनेचे बिल माफ करण्याबाबत निवेदन दिले.

दरम्यान, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. यावेळीही त्यांना निवेदने देण्यात आली. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाकुर्डे योजनेचे वीज बिल थकीत असल्याने सध्या ही योजना बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या योजनेचे लाभार्थी असणाऱया गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. म्हणूनच वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल माफ करून ही योजना पुन्हा कार्यान्वित करावी.

कराड दक्षिण मतदारसंघातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुंजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारूगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे या गावातील ग्रामस्थांना वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. पण या योजनेचे वीज बिल थकीत असल्याने सध्या ही योजना बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या भागातील लोकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. शिवाय वीज बिलाची थकीत रक्कम जास्त असल्याने शेतकऱयांना ही रक्कम भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल माफ करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. याबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी कराड दक्षिण मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या डाबंरीकरण व खडीकरणासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधीची मागणीही करण्यात आली.

कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, जगदीश जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, पैलवान धनाजी पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts: