|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘घडय़ाळ’ फुटले, ‘कमळ’ फुलले!

‘घडय़ाळ’ फुटले, ‘कमळ’ फुलले! 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेमध्ये चमत्कार घडून कमळ फुलेल, असे भाकित गेले दोन वर्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील करत होते. सोमवारी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक अफजल पिरजादे, अजिंक्य चव्हाण यांना फोडत भाजप-ताराराणी आघाडीने हे भाकित वास्तवात उतरवले. राष्ट्रवादीच्या मेघा पाटील यांचा पराभव होऊन भाजपचे आशिष ढवळे स्थायी समिती सभापती झाले. या निवडीनंतर आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला.

2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत 81 पैकी 44 उमेदवारांनी बाजी मारल्याने  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे महापालिकेत सत्ता आली. 33 उमेदवार निवडून आल्यामुळे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजप-ताराराणी आघाडीच्या रुपाने प्रबळ विरोधकही तयार झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे काठावरचे बहुमत असल्यामुळे महापौर, स्थायी समिती, परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडी चुरशीने होत आहेत. केंद्र, राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे कोल्हापूर महापालिकेमध्येही भाजपची सत्ता असावी, अशी भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची होती. मात्र, हे शक्य झाले नाही. तरीही पालकमंत्री पाटील महापालिकेमध्ये चमत्कार घडेल महापौर भाजपचाच होईल, असे भाकित नेहमी करत होते. अखेर सोमवारी त्यांनी सत्तेत आपला सहभाग नोंदवला.

                      

               राष्ट्रवादीतील इच्छुंकाची नाराजी कायम

डॉ. संदीप नेजदार यांची स्थायी समिती सभापतिपदाची वर्षाची मुदत संपल्याने या रिक्तपदासाठी निवडणूक जाहीर झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनुसार पुढील वर्षभरासाठी हे पद राष्ट्रवादीकडे होते. त्यामुळे अफजल पिरजादे, अजिंक्य चव्हाण, मेघा पाटील हे या पदासाठी इच्छुक होते. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. 8 फेब्रुवारी रोजी बंद लखोटातून मेघा पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यांनी या पदासाठी अर्जही दाखल केला. यानंतर नाराज अजिंक्य चव्हाण, अफजल पिरजादे यांची समजूत काढण्याचा
प्रयत्नही झाला. पुढील सहा महिन्यासाठी संधी दिली जाईल, अशी हमी दिली. मात्र, चव्हाण, पिरजादे यांची नाराजी कायम राहीली.

                                                पिरजादे, चव्हाण फूटले

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्यांना महाबळेश्वर येथे सहलीला पाठविण्यात आले होते. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास सर्व सदस्य सहलीवरून कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालय येथे आले. यानंतर 10.30 च्या सुमारास सर्व सदस्य मिळून महापालिकेत दाखल झाले. छत्रपती ताराराणी सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभापतिपदासाठी निवड
प्रक्रिया सुरु झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मेघा पाटील, भाजप-ताराराणी आघाडीकडून आशिष ढवळे यांच्यात लढत झाली. यामध्ये दोघांचेही अर्ज छाननीत वैध ठरले. खेमणार यांनी पहिले 15 मिनिटे माघारीसाठी दिले. यामध्ये कोणीही अर्ज माघार घेतला नाही. यानंतर हातवर करून मतदान घेण्यात आले. यामध्ये अशिष ढवळे यांना 9 तर मेघा पाटील यांना 7 मते मिळाली. त्यामुळे आशिष ढवळे यांची निवड स्थायी समिती सभापतिपदी झाल्याचे खेमणार यांनी जाहीर केले. केले. नूतन स्थायी सभापती ढवळे प्रभाग क्रमांक 16 शिवाजी पार्क या मतदार संघातील नगरसेवक आहेत.

            राष्ट्रवादीला  धक्का 

नाराज सदस्य पिरजादे व चव्हाण यांची राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी समजूत काढली होती. मतदानावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. स्थायी समिती सभापतीपदाचा उमेदवाराचा पराभव झाल्याचे समजताच सभागृहाबाहेर उभे असणाऱया मेघा पाटील यांचे सासरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार नामदेवराव भोईटे, आर. के. पोवार, राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह नगरसेवकांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर महापालिका वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाली.

सत्ताधाऱयांचा ‘बँडबाजा’ केला बूक

स्थायी समितीमध्ये 16 पैकी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे 9 सदस्य आहेत. त्यामुळे मेघा पाटील यांची स्थायी समिती सभापतिपदी निवड निश्चित मानले जात होते. पहिल्या महिला सभापती होणार अशीही चर्चा महापालिकेत होती. प्रत्यक्षात मात्र, राष्ट्रवादीच्या पिरजादे व चव्हाण यांनी विरोधात मतदान केल्यामुळे पाटील यांचा पराभव झाला. पाटील यांच्या समर्थकांनी आतषबाजी व बँड बाजा आणले होते. त्यांचा पराभव झाल्याने भाजप-ताराराणी आघाडीच्या समर्थकांनी पाटील यांचेच बँड बाजा बुक करत एकच जल्लोष केला.

        ज्यांना कोणीही नाही त्यांना महाडिक

राज्यात तीन वर्षापासून भाजप सत्तेवर आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे केली जात आहे. याचाच प्रभाव पिरजादे व चव्हाण यांच्यावर पडला असेल. त्यामुळेच त्यांच्या मतामध्ये परिवर्तन झाले आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक नेहमी म्हणतात, ‘ज्याला कोणीही नाही त्याला महाडिक’, असाच सकारात्मक विचार आपला आहे. महापालिकेवर सत्ता नसल्यामुळे निधी नाहा। असा विषय नाही, मनपातील 81 नगरसेवक आपणास समान आहेत.

                                       

Related posts: