|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चरावणेत ग्रामस्थांना उलटय़ा, जुलाबाचा त्रास

चरावणेत ग्रामस्थांना उलटय़ा, जुलाबाचा त्रास 

प्रतिनिधी/ वाळपई

सत्तरीतील चरावणे गावात अचानकपणे सुरू झालेल्या उलटी जुलाबाच्या आजाराने गेंधळ निर्माण झाला आहे. आतापर्यंत 40 पेक्षा जास्त जणांना याची लागण झाली असून त्यांच्यावर वाळपईच्या सामाजिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाळपई आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. आजाराचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गेल्या चार दिवसापासून काही नागरिकांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. काहीजणांनी खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले, मात्र रुग्णांची संख्या वाढत गेल्याने गावात खळबळ माजली. गेल्या चार दिवसात वाळपई सामाजिक रुग्णालयात 40 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यात आले. काही रुग्ण अजूनही दाखल होत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या आजाराने ग्रामस्थ त्रस्त असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. अनेकांना पोटात दुखणे, उलटी होणे, जुलाब होणे आदी त्रास होत आहे. याचे नेमके करण स्पष्ट होत नसले तरी दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या भागाचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी सरकारतर्फे गावातील विहिरींवर पंपांची व्यवस्था करून दिली आहे, मात्र दहा दिवसापूर्वी गावातील देवस्थानच्या धार्मिक उत्सवासाठी दाबोस पाणी प्रकल्पातील पाण्याची व्यवस्था केली होती. या पाण्याच्या वापरामुळेच या आजाराची लागण झाली असावी असा कायास अनेकांनी व्यक्त केला आहे. अनेक दिवसापासून बंद असलेल्या पाईपाईनमधून सोडण्यात आलेल्या या पाण्यातून पाईपमध्ये साचून राहिलेली घाण, व बेरच दिवस पाईपमध्ये साचून राहिलेले पाणी यामुळे प्रदूषित बनले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या धार्मिक उत्सवासाठी असलेल्या खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉलवर ज्यांनी गोबी मनच्युरियन खाल्ला त्यांनाच या आजाराची लागण झाली असल्याचेही काहीजणांकडून सांगण्यात आले. नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नसल्याने गावात गोंधळाचे वातावरण आहे.

दरम्यान, वाळपईचे आरोग्य अधिकारी डॉ. गजानन नाईक यांच्याशी संपर्क साधला असता हा आजार नियंत्रणात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील पाण्याचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. लवकरच आजाराचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. वाळपई पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी गणेश गावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गावाला दाबोस पाणी पुरवठा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येत नाही. गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा यंत्रणा राबविण्यात आली आहे, असे सांगितले.