|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पुतळय़ांबाबतचे पाचही ठराव फेटाळले

पुतळय़ांबाबतचे पाचही ठराव फेटाळले 

प्रतिनिधी/ पणजी

अखेर पुतळ्यासंदर्भातील पाचही ठराव विधानसभेत चर्चेला येणार नाहीत. विधानसभा अधिवेशनातल्या कामकाजासंदर्भातील निर्णयाच्यावेळी सोमवारी झालेल्या एक प्रक्रियेत 13 पैकी 5 खाजगी ठराव फेटाळण्यात आले. त्यात हे सर्व पाचही ठराव पुतळ्यांचे आहेत. यामुळे विधानसभा अधिवेशनात सरकारसमोर आलेले संकट तूर्तास टळल्यात जमा आहे.

एका महत्त्वपूर्ण घडामोडीत सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या दि. 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार असलेल्या विधानसभा अधिवेशना दरम्यान, जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी उपसभापती मायकल लोबो यांनी मांडलेला खाजगी ठराव, तसेच त्याला प्रत्यूत्तर म्हणून मगो पक्षाने टि.बी.कुन्हा आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांचे पुतळे उभारण्याबाबत मांडलेले खाजगी ठराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चर्चिल आलेमाव आणि काँग्रेसतर्फे मांडण्यात आलेले जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याचे ठराव, त्याचबरोबर भाजप आमदार राजेश पाटणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विधानसभा आवारात उभारण्यासंदर्भात मांडलेला खाजगी ठरावही फेटाळण्यात आला आहे.

सारी प्रक्रिया झाली ईन कॅमेरा!

विधानसभा कामकाजाविषयी दररोजचे प्रश्न तसेच तारांकित, अतारांकित प्रश्न ठरविण्यासाठी दररोज सायंकाळी प्रक्रिया केली जाते. सोमवारी या प्रक्रियेच्यावेळी आतापर्यंत आलेल्या खाजगी ठरावांबाबत पडताळणी करण्यात आली. त्यात 5 खाजगी ठराव अकारण वाद निर्माण करणारे व सभागृहातील कामकाजात अडथळा निर्माण करणारे असल्याने ते ठराव फेटाळण्यात आले. चिठ्ठय़ा टाकून त्यासाठी प्रक्रिया केली जाते. ईन कॅमेरामध्ये त्याचे सारे चित्रण केले जाते. सोमवारी जेव्हा हे ठराव फेटाळण्यात आले, त्यावेळी सारी प्रक्रिया कॅमेरात बंदिस्त करण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्य विधानसभेत पुतळ्यावरून निर्माण होणाऱया संघर्षाला विराम मिळणार आहे. पुतळ्याचे हे ठराव सत्ताधारी आघाडी विशेषतः त्यातील प्रमुख भागीदार असलेल्या भाजपला अडचणीत आणणारे होते. त्यामुळे  डॉ. प्रमोद सावंत यांनी या ठरावामुळे सभागृहातील वातावरण बिघडू नये, याच उद्देशाने हे ठराव बाहेर फेकले.

Related posts: