|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्यात कलेप्रमाणे जिव्हाळाही आहे!

गोव्यात कलेप्रमाणे जिव्हाळाही आहे! 

ज्येष्ट अभिनेते सचिन खेडेकर यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ पणजी

 गोव्यात कलेप्रमाणे भरपूर जिव्हाळाही आहे. गोवा ही कलेची भूमी असून अनेक कलाकारांनी गोव्यात जन्म घेतला आहे. लहान पणापासून गोव्यातील ज्येष्ट व्यक्तींचा आशीर्वाद घेत आलो आहे. आज अशाच जेष्ट कलाकारांचा सत्कार करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी खूपच आनंददायी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ट अभिनेते सचिन खेडेकर यांनी केले.

 कला व संस्कृती खात्याच्या वतीने कला अकादमीत आयोजित केलेल्या 2016-17 चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार विरतरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 प्रत्येकाच्या कलेचा आदर झाला पाहिजे. अनेक जाणकार प्रेक्षक गोव्यात आहेत. या भूमित कला सादर करणे खूपच आनंददायी आहे. गोव्याशी माझे नाते खूपच चांगले sआहे. या सर्व कलाकारांनी आपल्या कलेचे ज्ञान नविन पिढीला द्यावे, असेही ते म्हणाले.

 कला आतून आली पाहिजे : सावकार

 कला ही विद्येपेक्षा मोठी आहे. या सर्व जाणकार कलाकारांनी आपली कला आताच्या पिढीला देऊन त्यांना या क्षेत्रात आणले पाहिजे. विद्या ही आपल्याला शिकविते पण कला ही जन्मापासून असली पाहिजे. विद्या बाहेरुन शिकता येते पण कला आतुन आली पाहिजे. त्यामुळे कलाकार खूप महत्वाचा आहे, असे पद्मश्री प्रसाद सावकार यांनी सांगितले.

कलाकारांनी अडचणीवर मात करावीः मंत्री गावडे

 हा सोहळा चौरंगी आहे. ज्या लोककलाकारांनी आपल्या सुरुवातीच्या बिकट परिस्थिती आपली कला टिकवून आज गोव्यात मोठे नाव केले अशा कलाकारांचा हा सत्कार आहे. त्यांचा सत्कार हा गोवा शासनाचा सत्कार आहे. त्यांनी अनेक समस्यांवर मात करुन आपली कला पुढे नेली आहे. अशा कलाकारांना कला व संस्कृती खात्याने हा मान दिला आहे. कलाकारांना अनेक अडचणी येत असतात त्यांनी त्या अडचणीवर मात केली पाहिजे. कला व संस्कृती खाते अशा कलाकारांच्या कलेच्या कार्याची दखल घेत आहे, असे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

पुरस्कार प्राप्त कलाकार

 प्रमोद प्रियोळकर (संगीत), एफ. जी. आल्वरो दी परेरा (संगीत), दासु शिरोडकर (साहित्य), गजानन जोग (साहित्य), ऍविल्किटो आफान्सो (साहित्य), गणेश मराठे (नाटय़क्षेत्र), मारिया फर्नांडिस (तियात्र), रुमाल्डो डिसोझा (तियात्र), सदाशिव परब (चित्रकला), उदयबुवा फडके (कीर्तन), उमेश तारी (भजन), राम म्हाऊसकर (लोककला) यांना वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 उत्कृष्ट संस्था, ग्रंथालय पुरस्कार

 अंत्रुज लळीतक (उत्कृष्ट सांस्कृतिक संस्था), सदानंद शिरगांवकर (उत्कृष्ट ग्रंथपाल) मोहनदास नाईक (उत्कृष्ट ग्रंथपाल) सेंट झेवियर महाविद्याल (उत्कृष्ट ग्रंथालय) यांना या वर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 यावेळी कला व संस्कृती खात्याच्या माहिती पुस्तकीचे प्रकाशन करण्यात आले. काही पुरस्कार विजेत्यांनी आपले मनोगत मांडले. खात्यातर्फे अभिनेते सचिन खेडेकर यांचा स्त्कार करण्यात आला. खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी स्वागत केले. यावेळी गोवा ग्रंथलयाचे ग्रंथपाल कार्लोस फर्नांडिस उपस्थित होते. यावळी मोठय़ा संख्येने पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक व प्रेक्षक उपस्थित होते.

Related posts: