|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केपीटीसीएल कर्मचाऱयांना शेतकऱयांनी लावले पिटाळून

केपीटीसीएल कर्मचाऱयांना शेतकऱयांनी लावले पिटाळून 

वार्ताहर / काकती

काकती-गौंडवाड शिवारात शेतकऱयांचा विरोध डावलून उच्च विद्युत शक्तीचे टॉवर उभारण्यात येत आहेत. काही शेतकऱयांना जमिनीच्या नुकसानभरपाईचे गाजर दाखवून काम सुरू केले. अद्यापी कोणतीच नुकसानभरपाई मिळाली नसल्याने काम बंदचे आंदोलन छेडून कर्मचारी वर्गाला पिटाळून लावले आहे. यामुळे केपीटीसीएलच्या विरोधात आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी केपीटीसीएलचा शेतकरी विरोधी मनमानी कारभार ऐरणीवर आला आहे.

हिंडाल्को ते गौंडवाड काकती शिवारातून उच्च विद्युत शक्तीचे टॉवर उभारणीचे कामकाज शेतकरीवर्गाचा विरोध डावलून करण्यात येत आहे. जमिनीची व पिकांची झालेली नुकसानभरपाई देणार असल्याचे सांगून खांबांची उभारणी होत आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षभरापासून कोणतीच नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. काकती येथील एका शेतकऱयाने आपल्या शेतातील काम बंद पाडण्यास भाग पाडले. तरी त्याच्या अनुपस्थितीत चोरून काम सुरू केल्याने शेजारील शेतकऱयांनी काम बंद पाडण्यास भाग पाडले.

लागलीच सारा शेतकरीवर्ग जागरूक झाला. केपीटीसीएलचे विभागीय पर्यवेक्षक व त्यांच्या सहकाऱयांना बोलावून शेतकऱयांची नुकसानभरपाई दिल्याशिवाय टॉवर उभारणीचे काम करण्यात येऊ नये, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे. परिणामी काम बंद पडले आहे.

कायमस्वरूपी जमिनीचे नुकसान

होनगा औद्योगीक वसाहतीतील विद्युत केंद्रापासून गौंडवाडपर्यंत विद्युत टॉवरमळे जवळपास 70 एकर जागा कायमची जाणार आहे. सध्याची प्रती गुंठा दोन लाख रुपये होणारी किंमत धरल्यास 56 कोटीहून अधिक जागेची किंमत होणार आहे. याचे गांभीर्य शेतकऱयांनी ध्यानात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी निर्णायक लढा देण्यासाठी शेतकरीवर्ग सज्ज होणे आवश्यक झाले आहे.

लोकप्रतिनिधींचा कानाडोळा

या भागातील आमदार, पालकमंत्री आदी लोकप्रतिनिधींनी शेतकऱयांच्या होणाऱया नुकसानीकडे कानाडोळा केला आहे. या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पर्यायी जंगलातून विद्युत टॉवर घालण्यास भाग पाडले असते तर जमिनीचे होणारे मोठे नुकसान टाळले असते. सध्या होणारी नुकसानभरपाई मिळवून देण्यास पुढाकार घ्यावा, अशी शेतकरीवर्गातून मागणी होत आहे. अन्यथा शेतकरी संघटनांच्यावतीने उग्र आंदोलन छेडून काम कायमचे बंद पाडण्याचा निर्णय शेतकरीवर्गातून होत आहे..

Related posts: