|Friday, August 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पिग्मी कलेक्टर झाला निपाणीचा ‘सभापती’

पिग्मी कलेक्टर झाला निपाणीचा ‘सभापती’ 

वार्ताहर/ निपाणी

 नगरपालिकेच्या विश्वासराव शिंदे सभागृहात सोमवारी सायंकाळी स्थायी समिती सदस्यांची बैठक पार पडली. नगरसेवक जे एका पतसंस्थेत पिग्मी कलेक्टर म्हणून सेवा बजावतात. अशा नितीन शिवाजी साळुंखे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड या बैठकीत करण्यात आली.

 बैठकीच्या प्रारंभी स्वागत आयुक्त दीपक हरदी यांनी केले. निपाणी शहर प्राधिकरणचे अध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार व नगरसेवक रविंद्र शिंदे यांनी नितीन साळुंखे यांच्या निवडीची घोषणा केली. तर या निवडीला अनुमोदन नगरसेवक संजय सांगावकर यांनी दिले. त्याचप्रमाणे तरुण भारतचे अभिनंदन करताना नितीन साळुंखे यांच्या निवडीसाठीचे वृत्त अचूक ठरल्याचे सांगितले. या निवडीनंतर पालिकेच्यावतीने सत्कार सोहळा पार पडला.

याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले, गेल्या चार वर्षात सुरुवातीच्या अडीच वर्षात वेगवेगळ्य़ा घडामोडी घडल्या. पण नंतर पालिकेने विकासाची दिशा धरली आहे. पालिकेच्या माध्यमातून कार्य करताना पालकमंत्री रमेश जारकीहोळी, माजी आमदार काका पाटील, प्रा. सुभाष जोशी, खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व पदाधिकाऱयांच्या निवडी केल्या आहेत. सर्व जाती-धर्मांना घेऊन कार्य सुरू आहे.

प्रामाणिक कार्याची दखल घेत निवड

नितीन साळुंखे हे सामान्य पिग्मी कलेक्टर व निष्ठावंत नगरसेवक आहेत. त्यांनी आजवर केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन नाभिक समाजाचा सन्मान करणारी ही निवड करण्यात आली आहे. आजवर नाभिक समाजातून सुनीता चव्हाण, अशोक राऊत हे नगरसेवक झाले. पण त्यांना कोणत्याही पदाची संधी मिळाली नव्हती. ही संधी नितीन साळुंखे यांच्या माध्यमातून नाभिक समाजाला प्राप्त झाली आहे, असे सांगितले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण, नगरसेवक राजेंद्र चव्हाण, दिलीप पठाडे, नजहतपरवीन मुजावर, नम्रता कमते, अनिस मुल्ला, रवींद्र चंद्रकुडे, धनाजी निर्मळे आदींनी मनोगत व्यक्त केले. नितीन साळुंखे यांनी निवडीबाबत कृतज्ञता व्यक्त केली. बैठकीला नगरसेविका उज्वला पोळ, मिनाक्षी बुरुड, लता शेटके, जायेदा बडेघर, निता लाटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Related posts: