|Saturday, May 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अट्टल दुचाकी चोरटय़ांची टोळी जेरबंद

अट्टल दुचाकी चोरटय़ांची टोळी जेरबंद 

चिकोडी पोलिसांची कारवाई : 8 लाख 29 हजार किंमतीच्या दुचाकी चोरल्याची कबुली

प्रतिनिधी/   चिकोडी

 चिकोडीसह ठिकठिकाणच्या 8 लाख 29 हजार किमतीच्या तब्बल 29 दुचाकी चोरणारे 6 अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्य़ात सापडले. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. चिकोडीत चैन स्नॅचरचा तपास करीत असताना काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता ही बाब उघडकीस आली. सर्व चोरटय़ांना सोमवारी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर गणेश धोंडीराम जाधव हा फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

 करण शिवाजी बागडी (रा. म्हैशाळ), बबलू आब्बस पठाण, राघवेंद्र मोहन माने, सद्दाम कलंदर पठाण, आप्पय्या सिद्धप्पा केसरगोळ (सर्व रा. रायबाग) व संतोष शंकर सनदी (रा. जलालपूर) अशी अटक केलेल्या चोरटय़ांची नावे आहेत.

 बेळगाव जिह्याचे पोलीस वरिष्ठाधिकारी, चिकोडीचे डीएसपी पवार, सीपीआय मल्लनगौडा नायकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडीचे पीएसआय संगमेश व पीएसआय होसमणी यांनी चिकोडी शहराबाहेर गणेशनगरनजीक चैन स्नॅचर संदर्भात चौकशी करताना तिघा संशयित तरुणांना शनिवारी ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांची चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. यानंतर सोमवारी आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांनी 29 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

 सदर सहाजण ठिकठिकाणी लावण्यात येणाऱया दुचाकी हेरत असत. यानंतर त्या दुचाकी लांबवत असत. गस्त घालताना संशयितावरुन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत तपास चालवला. यानंतर आणखी दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या कारवाईमध्ये बी. एन. माळेद, एस. बी. कित्तूर, आर. एफ. नदाफ, व्ही. बी, गायकवाड, एम. इम. करगुप्पी, जी. एस. कांबळे, आदी पोलीस कर्मचाऱयांचा समावेश होता.

चोरटय़ांची टोळी लागली गळाला

धूमस्टाईलद्वारे महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱया चोरांना पकडण्याची मोहीम वरिष्ठांच्या सुचनेनुसार चिकोडी पोलीस पथकाने राबविली होती. पण या मोहिमेत मासा गळाला लागल्याप्रमाणे दुचाकींची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली. कसून चौकशी केल्यानंतर या सर्व आरोपींनी गुह्याची कबुली दिली.

चोरीच्या दुचाकी चिकोडीसह सीमाभागातील…

पोलिसांनी कसून चौकशी केली असता सदर सहा जणांनी 29 दुचाकी या चिकोडी उपविभागासह सीमाभागातून चोरल्याची कबुली दिली. यामध्ये दोन स्प्लेंडर, एक स्प्लेंडर प्लस, 12 स्प्लेंडर प्रो, पाच डिस्कव्हर, चार पल्सर, तीन हिरो डिलक्स, एक टीव्हीएस स्पॉट, एक फॅशन प्रो अशा दुचाकी लांबविल्या आहेत.

Related posts: