|Friday, February 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » माती खातो गे श्रीपती

माती खातो गे श्रीपती 

भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची कथा सांगताना नामदेवराय पुढे सांगतात –

मुलें सांगताती ।

माती खातो गे श्रीपती ।।

लांकूड घेऊनि हातांत ।

माती खातो कां पुसत ।।

भावा भुललासे खरा ।

कांपतसे थरथरा ।।

मुख दावीं उघडोनी ।

पाहें म्हणे चक्रपाणी ।।

ब्रह्मांडें देखिलीं ।

नामा म्हणे वेडी झाली ।।

श्रीमद्भागवतात ही कथा विस्ताराने आली आहे ती अशी-एके दिवशी बलरामासह गवळय़ांची मुले कृष्णाबरोबर खेळत होती. त्यांनी यशोदेला सांगितले-आई! कन्हैयाने माती खाल्ली आहे. घरांत एवढे दूध, दुभते असताना कान्हा माती का खातो? मुलाचे हित इच्छिणाऱया यशोदेने हातात काठी घेतली, कृष्णाचा हात पकडला आणि रागावून त्याला विचारले-काय रे खोडसाळा! तू माती का खाल्लीस? पहा, तुझ्या बरोबरीची मुले काय म्हणतात ते! तुझा बलरामदादा सुद्धा तेच सांगतो आहे. भगवान भक्तिभावाला भुलले आहेत हेच खरे! यशोदा रागावली, त्यावेळी श्रीकृष्णाचे डोळे भीतीने गांगरले होते. तो चक्क थरथर कापत होता. घाबरत घाबरत तो यशोदेला म्हणाला-आई! मी माती खाल्ली नाही. हे सर्वजण खोटे बोलत आहेत. तुला जर यांचेच म्हणणे खरे वाटत असेल, तर तू आपल्या डोळय़ांनीच माझ्या तोंडात पाहा.

यशोदा म्हणाली-ठीक आहे, असे आहे, तर तोंड उघड पाहू! मातेने असे म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी आपले तोंड उघडले. कान्हय़ाच्या तोंडात जे पाहिले ते पाहून यशोदा वेडी झाली असे नामदेवराय म्हणतात.

भागवतात वर्णन आले आहे-यशोदेसमोर गांगरून जाऊन तोंड उघडून उभे असलेले ते बालक काय सामान्य होते? अनंत ऐश्वर्य संपन्न असे ते परब्रह्म केवळ लीला करण्यासाठीच मनुष्य बालक बनले होते. त्याच्या मुखामध्ये चराचर विश्व, आकाश, दिशा, डोंगर, द्वीप आणि समुद्रांसहित सर्व पृथ्वी, वायू, अग्नी, चंद्र आणि ताऱयांसह संपूर्ण ज्योतिर्मंडल, पाणी, तेज, वैकारिक अहंकाराचे कार्य असणारी इंद्रिये, पंच तन्मात्रा, तीन गुण, जीव, काल, स्वभाव, कर्म, वासना, शरीर इत्यादी विभिन्न रूपात दिसणारे हे विश्व आणि स्वतःसह सारे गोकुळ श्रीकृष्णाच्या उघडलेल्या लहानशा मुखात पाहून यशोदा साशंक झाली. ती विचार करू लागली-हे स्वप्न आहे की भगवंताची माया? माझ्या बुद्धीत तर काही भ्रम निर्माण झाला नाही ना? का माझ्या या मुलातच जन्मतः काही योगसिद्धी आहे? मग यशोदा मनोमन म्हणाली-जे चित्त, मन, कर्म आणि वाणीच्या द्वारा पूर्णपणे व सुलभतेने अनुमानाचा विषय असू शकत नाही, ते हे सर्व विश्व ज्याच्या आश्रयाने आहे आणि ज्याच्या सत्तेनेच याची प्रचिती येते, ज्याचे स्वरूप सर्वथैव अचिंत्य आहे, त्या परमपदाला मी नमस्कार करीत आहे.  त्याचवेळी ती असाही विचार करू लागली की ही मी आहे आणि हे माझे पती आहेत, तसेच हा माझा मुलगा आहे, त्याचबरोबर मी व्रजराजाच्या सर्व संपत्तीची स्वामिनी, धर्मपत्नी आहे, या गोपी, गोप आणि गोधन माझे आहे.

– ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: