|Friday, February 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » तुझे आहे पुलंपाशी

तुझे आहे पुलंपाशी 

काकाजी : अरे श्याम, ज्या वयात प्रेयसीशी सूत जमवायचं, त्या वयात पुढाऱयांच्या सतरंज्या उचलायचा कसला रे हा सुतकी सोस?

श्याम : काकाजी, तीच चूक आज दुरुस्त करायची म्हणतोय मी. गीता, तू काय, बाकीचे संस्कृतीरक्षक काय, सगळी मोठी माणसं आहात. आपण पाहिलं, आपल्याला काही हा थोरपणा पेलणार नाही. सकाळपासून व्हेलेंटाईन डेचा निषेध करणाऱया पोस्ट फॉरवर्ड करून करून नेटपॅक संपत आला. शेवटी नव्या नावानं अकौंट काढून गुलाबाच्या फुलाचं कव्हरपिक बनवलं.

गीता : मी बघितलं ते आणि तुझाच फेक आयडी आहे हे ओळखून लाईक देखील केलं. .

(मागून आचार्य येतात.)

आचार्य : गीता, काय केलंस हे? काय तुझं वागणं?

उषा : आचार्य, ती शेवटी स्त्री आहे. निसर्गानं तिच्याही ठिकाणी काही निराळय़ा भावना निर्माण केल्या आहेत. तिला कधी स्वतःचा मित्र असावा असं वाटलं असेल. झेड ब्रिजवर नाहीतर उद्यानात बसावंसं वाटलं असेल, याचा काही विचार शिवला होता तुमच्या मनाला?

(गीता रडू लागते.)

आचार्य : गीता, बेटा, मला माफ कर. संस्कृतीच्या रक्षणासाठी म्हणून आंदोलनात उडी घेतली तेव्हा संस्कृती म्हणजे काय हेच मला समजलं नव्हतं. बेगडी संस्कृतीरक्षकाची वस्त्रं एकदा चढवली की ती उतरून खरं बोलणं कदापि शक्मय नसतं. मग पाश्चात्यांनी बनवलेला ध्वनिवर्धक, रेडिओ, टीव्ही, संगणक, आंतरजाल वापरून मी ओरडत राहिलो की त्यांची संस्कृती झूठ आहे. सुरुवातीला लोक जमले माझ्या पाठीशी. प्रेयसीनं नकार वगैरे दिला असेल अशांनी माझा झेंडा घेतला आणि व्हेलेंटाईन डेचा निषेध करीत दुकानांवर दगड घातले, गुलाब कुस्करले. पण वर्षं लोटली. त्यांना जीवनसाथी मिळत गेल्या तसे ते मला सोडून गेले. मला कळत होतं की आसपासचे उरलेले मूठभर तरुण माझा तोंडदेखला जयजयकार करताहेत. पण त्यांना त्यांची वयं, वयात आलेली शरीरं, त्यातले हार्मोन्स आतून छळताहेत.  श्याम, गीता- लपून छपून नव्हे, खुल्लम खुल्ला एकत्र या. अरे आपल्या संस्कृतीने गृहस्थाश्रम नाकारला नाही काही. फक्त तो आमच्या नशिबात नव्हता, इतकंच. जा, आजचा दिवस झेड ब्रिजवर बसून चिमणीच्या दातांनी तोडून चॉकलेट खा. पोलिसांनी पकडलं तर मला व्हॉटस्ऍपवर मेसेज द्या. तुम्हाला जामीन द्यायला येईन मी.

Related posts: