|Friday, February 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पाकिस्तानला धडा शिकवाच!

पाकिस्तानला धडा शिकवाच! 

जम्मू काश्मीरमधील सुंजवान येथील लष्करी तळावर गेल्या दोन दिवसांत लष्कर ए तोयबाच्या आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले. हे कृत्य करणाऱया पाकिस्तानच्या विरोधात साऱया देशात संतापाची लाट उसळलेली असताना काँग्रेसचे काही नेते मात्र पाकिस्तानऐवजी देशातील सरकारला दोष देण्यात आपली शक्ती वायफळ खर्च करीत आहेत. यातून ते कोणाला बळ देतात कोणास ठावुक परंतु लष्कराचे खच्चीकरण करण्यासाठी देशातील राजकीय नेते मात्र कंबर कसून उभे असल्याचे दिसते. भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी जम्मूमध्ये जाऊन एकंदर परिस्थितीची पाहणी केली. लष्करी अधिकाऱयांबरोबर बैठक घेतली. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबरही चर्चा करून जे निवेदन केले त्यातून एक संदेश त्यांनी जरूर दिला व तो म्हणजे पाकिस्तानने केलेल्या दुःसाहसाची किंमत त्यांना चुकवावी लागेल. संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या या इशाऱयाची अंमलबजावणी होईल का? यापूर्वी केंद्राने इशारा दिलेला होता की, एकाच्या बदल्यात दहा शिरे पाकिस्तानातून आणू. एक दोन वेळा भारताने मिनी सर्जिकल स्ट्राईकद्वारे हे करूनही दाखविले. मात्र आता वेळ आली आहे, पाकिस्तानला त्याचबरोबर या देशात दडून बसलेल्या पाकिस्तानी मनोवृत्तीच्या व्यक्तींना धडा शिकविण्याची. देश अलीकडे दररोज पाकिस्तानातून येणाऱया दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांचे रक्त गमावित आहे. भारतीय जवानांचे जात असलेले प्राण देशवासियांना दिवसेंदिवस असहय़ होत आहे. मंगळवारी संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱयानंतर पाकिस्तानच्या बाजूने तेथील संरक्षणमंत्र्यांनी भारताला प्रत्युत्तरादाखल दिलेला इशारा म्हणजे ‘चोर तो चोर आणि वर शिरजोर?’ अशीच पाकिस्तानची काहीशी अवस्था झालेली आहे. दुर्दैवाने जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री व तेथील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते पाकच्या प्रेमात आहेत. दररोज भारतीय जवानांची हत्या होते आहे आणि या बाई पाकिस्तानशी युद्ध नको, चर्चा हवी आहे, अशी मागणी कशी काय करत आहेत? परवा जम्मू काश्मीर विधानसभेत नॅशनल कॉन्फरन्सच्या एका आमदाराने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. खरे तर हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. अशा नेत्यांना देशाने त्यांची जागा दाखवून द्यावी. या देशात दिवसेंदिवस गद्दारांची वाढती संख्या हा देखील तेवढाच चिंतेचा विषय बनत चालला आहे. पाकिस्तानने भारताविरुद्ध छुपे युद्ध पुकारलेले आहे. जैश-ए-महम्मदचा म्होरक्या मसूद अजहर या दहशतवाद्यांच्या प्रमुखाने भारतात दहशतवादी हल्ले चालू ठेवलेले आहेत. सुंजावनमध्ये लष्करावर जो काही हल्ला झाला तो देखील या म्होरक्यानेच रचविलेले हे कटकारस्थान आहे. दोन चार दहशतवादी देशात घुसवायचे आणि हे दहशतवादी संपले की दुसरे पाठवायचे. हे दहशतवादी या देशात मरण्यासाठीच येतात खरे परंतु आपण मरण्यापूर्वी ते या देशातील चार/पाच जवानांना व निष्पाप नागरिकांना मारून जातात. या दहशतवाद्यांना खतपाणी घालणारे घरभेदी हे देखील काश्मीरमध्येच आहेत. भारतीय लष्कराने कारवाई केल्यानंतर लष्कराच्या विरोधात एफआयआर नोंदविण्याचे क्रूरकृत्य हे मेहबूबा मुफ्ती सरकारने केले आणि दुर्दैवाने दस्तुरखुद्द मुख्यमंत्री या निर्णयाचे समर्थन करतात. हा लष्कराचा व या देशाचा अवमान आहे. काश्मीरला जे काही 370 वे कलम लागू आहे त्यातून या देशातील नागरिक काश्मिरमध्ये जाऊन राहू शकत नाही व काश्मिरमधील बरेचसे नागरिक हे पाकिस्तानचाच उदो उदो करीत असतात. यातून या देशाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे. काश्मिरला देण्यात आलेले स्वातंत्र्य हे अति होते आहे. आता तरी संविधानात बदल करून कलम 370 रद्द करण्याची वेळ आलेली आहे. भारतात राहून शत्रू राष्ट्रांशी हातमिळवणी करण्यात काही राजकीय नेतेमंडळीदेखील ज्या पद्धतीने काश्मिरमध्ये वागतात ते पाहता काश्मिरमध्ये राष्ट्रपती राजवटीची गरज आहे आणि पाकिस्तानने जे काही कृत्य दोन चार दिवसांत केलेले आहे त्याला भारताने असे प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे की पुन्हा कधीही अशा पद्धतीचे हल्ले करण्याची हिम्मत पाकिस्तानला होणार नाही. ‘एक के बदले दस’ म्हणणाऱया केंद्रातील भाजप सरकारने आता पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी यंत्रणा आखावी कारण पाकिस्तान हा बदलणारा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी मैत्री वाढविण्याच्या उद्देशाने अनेक प्रयत्न केले मात्र ‘पालथ्या घडय़ावर पाणी!’ आता वेळ आली आहे, पाकिस्तानची नांगी ठेचण्याची. पाकिस्तानला कायमस्वरुपी अद्दल घडवावी लागणार आहे. सुंजवानमध्ये जे काही घडले आणि देशाला पाच जवान गमवावे लागले, ही अत्यंत गंभीर बाब आहे. आता भारताने माघार घेऊन उपयोगाचे नाही. पाकिस्तान म्हणे आपली एक एक इंच जमीन संरक्षणासाठी प्रयत्न करत आहे. पाकच्या सरंक्षणमंत्र्यांनी भारताला प्रत्युत्तर देऊ, असा जो इशारा दिलेला आहे, हे आव्हान आहे. भारताने आता सुंजवानमधील घटनेचे उट्टे काढून पाकिस्तानला कायम स्मरणात राहील, अशा पद्धतीने चोख प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. पाकिस्तानने सर्व मर्यादा तोडल्या. दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे, भारतात दहशतवादी पाठविणे, भारतातील निरपराध नागरिकांना लक्ष्य करणे हे सारे प्रकार अत्यंत घृणास्पद आहेत. भारताला आता कठोर निर्णय घ्यावेच लागतील. पाकिस्तानने साऱया सीमारेषा ओलांडलेल्या आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो इशारा दिलेला आहे, त्याची अंमलबजावणी मात्र त्वरित झाली पाहिजे. पाकिस्तानातून येणारे दहशतवादी थेट हल्ला करीत नाहीत तर ते काश्मिरमध्ये राहून परिस्थितीचा अभ्यास करतात. त्यांना आश्रय देणारे कोण? ते तेवढेच देशद्रोही आहेत. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकविल्यानंतर या देशातील फुटीर मनोवृत्तीच्या व्यक्तींनाही कायद्याचा इंगा दाखविणे तेवढेच आवश्यक आहे. पाकिस्तानच्या साऱया वाटाच बंद झाल्यानंतर पाकिस्तानची बिशाद राहील काय?

Related posts: