|Friday, February 22, 2019
You are here: Home » उद्योग » भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत शाओमीची मक्तेदारी

भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत शाओमीची मक्तेदारी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेतील सॅमसंगचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. शाओमी या चिनी कंपनीने डिसेंबर 2017 मध्ये संपलेल्या तिमाहीत सॅमसंगला मागे टाकले. शाओमीने पहिल्यांदाच सॅमसंगला मागे टाकल्याचे इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या आकडेवारीतून समोर आले. व्हिवो ही चिनी कंपनी तिसऱया स्थानी आहे.

शाओमी कंपनीचा बाजारातील हिस्सा वाढत 26.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑफलाईन क्षेत्रात विस्तार करण्यात आल्याने कंपनीने 200 दशलक्षपेक्षा अधिक स्मार्टफोनची विक्री केली आहे. ऑनलाईन प्रकारात विस्तार आणि मार्केटिंगवर भर देण्यात आल्याने कंपनीच्या विक्रीमध्ये वाढ नोंदविण्यात आली. सॅमसंगचा हिस्सा 23.5 वरून 24.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र कंपनीची विक्री शाओमीच्या तुलनेत कमी आहे.

व्हिवोचा बाजारहिस्सा सप्टेंबरमधील 8.5 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. लेनोवोचा गेल्या तिमाहीत तिसरा क्रमांक होता. या कंपनीचा हिस्सा 9 टक्क्यांवरून 5.6 वर पोहोचला आहे. ओप्पो कंपनीचा हिस्सा 7.9 वरून 4.9 टक्क्यांवर गेला आहे. या अहवालात ऍपल, वनप्लस आणि हय़ुवाई कंपनीच्या विक्रीची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

भारतीय स्मार्टफोन बाजारातील विक्री घटत असल्याची भीती फेटाळण्यात आली आहे. 2017 मध्ये वर्षाच्या आधारे विक्रीमध्ये 14 टक्क्यांनी वाढ होत 124 दशलक्षवर पोहोचली आहे. तिमाहीच्या तुलनेत 22 टक्क्यांनी वाढ झाली. चिनी बाजारपेठेत घसरण, तर अमेरिकन बाजारपेठेत विक्री स्थिर दिसून आली. चिनी कंपनीचा एकूण हिस्सा 2016 च्या 34 टक्क्यांवरून 2017 अखेरीस 53 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Related posts: