|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुणकेश्वरात फुलला शिवभक्तीचा मेळा

कुणकेश्वरात फुलला शिवभक्तीचा मेळा 

गुरुवारी पहाटे तीर्थस्नानाची पर्वणीः आज होणार गर्दीचा उच्चांक

राजेंद्र मुंबरकर / देवगड:

श्रीदेव कुणकेश्वराच्या चरणाशी लीन होण्यासाठी भक्तांचा महासागरच जणू या तीर्थक्षेत्री लोटला आहे. मंगळवारी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.  सलग तीन दिवस महाशिवरात्रीचा उत्सव होणार असून यासाठी देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. पहिली पूजा मानकरी यांच्यानंतर मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक रेखा भास्कर भोईर व मुंबईच्या दादर विभागातील नगरसेविका स्नेहल सुधीर जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी थेट देवाच्या गाभाऱयात दर्शन खुले करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी पहाटे एक वाजल्यापासून तीर्थस्नानाची पर्वणी भाविकांना राहणार आहे. तर यात्रेच्या दुसऱया दिवशी बुधवारी भाविकांची मोठी गर्दी उसळणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर यांनी सांगितले.

मंगळवारी पहाटेपासूनच श्रीदेव कुणकेश्वराच्या दर्शनासाठी यात्रेमध्ये भाविकांनी अलोट गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. पहाटे श्रीदेव कुणकेश्वराची पहिली विधीवत पूजा, आरती, महाआरती झाल्यानंतर मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक रेखा भास्कर भोईर व मुंबईच्या दादर विभागातील नगरसेविका स्नेहल सुधीर जाधव यांनाही पूजेचा मान मिळाला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर व पदाधिकारी तसेच कुणकेश्वर सरपंच नयना आचरेकर, उपसरपंच रामानंद वाळके, श्रीदेव कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष प्रकाश वाळके व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

भाविकांची अलोट गर्दी

मंगळवारी पहाटेपासूनच रांगेतून भाविकांना दर्शन देण्यात आले. गेल्यावर्षी मुखदर्शन ठेवण्यात आले होते. यावेळी श्रीदेव कुणकेश्वराच्या गाभाऱयात थेट दर्शनाचा लाभ भाविकांना देण्यात आला. पहाटेपासूनच एसटी महामंडळाच्यावतीने गावोगावी बसफेऱयांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांची अलोट गर्दी पहाटेपासूनच दिसून आली. समुद्रकिनारीही भाविकांनी सायंकाळनंतर मोठी गर्दी केली. यावेळी भाविकांनी समुद्रस्नानाचा आनंदही लुटला. कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्यावतीने रस्ता दुतर्फा दुकाने मांडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोणतीही अनूचित घटना घडू नये, याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. बाजारपेठेत झुला व करमणुकीचे खेळ मांडण्यात आले आहेत. विविध आकर्षक वस्तूंची दुकाने बाजारपेठेत मांडलेली दिसत आहेत. समुद्रात स्नान करणाऱया भाविकांवर नजर ठेवण्यासाठी खास लाईफ गाईडची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालकमंत्री दीपक केसरकरांच्या हस्तेही पूजा

सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पहिल्या पूजेनंतर श्रीदेव कुणकेश्वराची विधीवत पूजा केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार ऍड. अजित गोगटे व पदाधिकारी उपस्थित होते. श्री. केसरकर यांचा देवस्थान ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर यांनी प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मंगळवारी दुपारी आमदार नीतेश राणे यांनी श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. त्यांचा ट्रस्टचे ऍड. वासुदेव मुणगेकर, रावजी वाळके, एकनाथ तेली, सत्यवान तेली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आमदार वैभव नाईक यांनीही देवाचे दर्शन घेतले.

सुरक्षिततेच्यादृष्टीने विशेष खबरदारी

संपूर्ण यात्रेवर नजर ठेवण्यासाठी 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिर परिसर, बाजारपेठ व विशेषतः समुद्र किनारी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. समुद्रकिनारीही भाविकांनी सायंकाळनंतर मोठी गर्दी केली असून काही भाविकांनी समुद्रस्नानाचा आनंदही लुटला. यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये व अनुचित प्रकार टाळण्यासाठी ग्रामपंचायत विभागाकडूनही योग्य खबरदारी घेण्यात आली आहे. ड्रोन कॅमेराही सज्ज असून त्याचे चित्रिकरण करण्यात येत आहे. संपूर्ण यात्रेचा देवगड महसूल विभागाकडूनही आढावा घेण्यात येत आहे. देवगडचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पहिल्या दिवशी एका देवस्वारीची भेट

हुंबरट येथील जैन पावणादेवी-बाणकीलिंग देवस्थानच्या देवस्वारीने श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. उशिरापर्यंत देवाच्या दर्शनासाठी अन्य देवस्वाऱया दाखल होणार आहेत. दिवसभर जिल्हय़ातील अनेक भजन मंडळाने सुश्राव्य भजने सादर केली.

मिठमुंबरी सागरी किनाऱयावरही दुकाने

 मिठमुंबरी-तारामुंबरी पुलावरून कुणकेश्वर येथे जाण्यासाठी भाविकांची दिवसभर वर्दळ सुरू होती. यावर्षी प्रथमच खासगी वाहतुकीसाठी हा पूल खुला करण्यात आला आहे. या मार्गात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  मिठमुंबरी सागरी किनाऱयावर प्रथमच दुकाने मांडण्यात आली आहे. या सागर किनाऱयाचा आस्वादही भाविक घेताना दिसत होते.

Related posts: