|Friday, February 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » न्यूझीलंडचा इंग्लंडवर 12 धावांनी विजय

न्यूझीलंडचा इंग्लंडवर 12 धावांनी विजय 

वृत्तसंस्था / वेलिंग्टन

तिरंगी टी-20 मालिकेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने इंग्लंडचा 12 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडचा कर्णधार विलीयमसनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ यापूर्वीच अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. 21 फेब्रुवारीला अंतिम सामना खेळविला जाईल. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील आपले तीन सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे.

मंगळवारच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकांत 5 बाद 196 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 20 षटकांत 9 बाद 184 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज बोल्टने डावातील 18 व्या षटकांत शेवटच्या सलग दोन चेंडूवर इंग्लंडचे जॉर्डन आणि प्लंकेट यांचा त्रिफळा उडविल्याने इंग्लंडची स्थिती 18 व्या षटकांत 8 बाद 168 अशी केविलवाणी झाली पण त्यानंतर इंग्लंडच्या रशीदने बोल्टचा नव्या षटकांतील पहिला चेंडू खेळून काढल्याने बोल्टची संभाव्य हॅट्ट्रीक हुकली.

न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या ग्युपटीलने 40 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 65 तर कर्णधार विलीयमसनने 46 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 72 धावा तडकावल्या. या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 82 धावांची भागिदारी केली. चॅपमनने 13 चेंडूत 2 षटकारांसह 20 तर सिफर्टने 2 षटकारांसह 6 चेंडूत नाबाद 14 धावा केल्या. न्यूझीलंडच्या डावात 11 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे वूड आणि रशीद यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले असून जॉर्डनने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये मलानने 40 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 59, हेल्सने 24 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 47, व्हिन्सने 1 षटकारांसह 10, बिलींग्जने 1 चौकारांसह 12, विलीने 10 चेंडूत 2 षटकारांसह 21 धावा जमविल्या. हेल्स आणि मलान यांनी दुसऱया गडय़ासाठी 65 धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या डावात 8 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे बोल्ट, सँटेनर आणि सोधी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले असून साऊदीने 1 बळी मिळविला. या मालिकेत आता शुक्रवारी ऑकलंड येथे न्यूझीलंडचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड 20 षटकांत 5 बाद 196 (विलीयमसन 72, ग्युपटील 65, चॅपमन  20, सिफर्ट नाबाद 14, मुनेरो 11, वूड आणि रशीद प्रत्येकी 2 बळी), इंग्लंड 20 षटकांत 9 बाद 184 (हेल्स 47, मलान 59, विली 21, बिलींग्ज 12, व्हिन्स 10, बोल्ट, सँटेनर, सोधी प्रत्येकी 2, साऊदी 1 बळी).

Related posts: