|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी गोपीचंद पडळकर

भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी गोपीचंद पडळकर 

मुख्यमंत्र्यांनी केला गौरव: तरूणाईचे संघटन वाढविण्याचा निर्धार

प्रतिनिधी/ आटपाडी

भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक व खानापूर विधानसभा मतदारसंघाचे नेते गोपीचंद पडळकर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडीचे पत्र गोपीचंद पडळकर यांना देवून त्यांचा गौरव केला.

गत 12 वर्षापासून आटपाडी तालुक्याच्या राजकीय पटलावर सर्वसामान्य कुटुंबातील गोपीचंद पडळकर यांनी आपले अस्तित्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय समाज पक्षातून राजकीय आयुष्याची सुरूवात करणारे गोपीचंद पडळकर यांनी गत विधानसभा निवडणूक भाजपच्या माध्यमातून लढविली. उत्कृष्ट वक्तृत्त्व लाभलेल्या गोपीचंद पडळकर यांचा भारतीय जनता पार्टीने विविध निवडणुकांच्या निमित्ताने प्रचार मोहिमांमध्ये त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वांशी असणाऱया संबंधांमुळे कोणतेही पद नसताना गोपीचंद पडळकर यांनी जिल्हय़ामध्ये आपले अस्तित्त्व दाखवुन दिले आहे. शिवाय पक्षीय राजकारणातही गोपिचंद पडळकर हे जिल्हय़ातील प्रमुख मान्यवरांच्या पहिल्या रांगेत असतात. आजपर्यंत ते कोणत्याच अधिकृत पदावर नव्हते. परंतू या युवा नेतृत्त्वाला भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देवून त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पाठबळ देण्याची भूमिका घेतली.

इस्लामपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत गोपीचंद पडळकर यांची युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवडीची अधिकृत घोषणा करून सत्कार करण्यात आला. भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पुनम महाजन, प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्यासह भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षसंघटन मजबुत करण्याचे आवाहन या निवडीप्रसंगी करण्यात आले.

तरूणांना व्यासपीठ देणार

सांगली जिल्हय़ातील युवकांना भाजपशी जोडणे, पक्षाची ध्येयधोरणे त्यांच्यापर्यंत पोहचविणे, सक्रिय राजकारणात तरूणाईला विधायक व्यासपीठ उपलब्ध करणे, गाव तेथे युवा मोर्चाची शाखा काढणे, युवाशक्तीला व्यापक रूप देणे, जिल्हय़ात भाजप अव्वल ठेवण्यासह प्रामाणिक तरूण कार्यकर्त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी देवुन सांगली जिल्हा भाजपा युवा मोर्चा राज्यात आघाडीवर राहिल, यासाठी आपण प्रमाणिक प्रयत्न करू.

Related posts: