|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शासनाच्या कर्जमाफीचा 70 टक्के शेतकऱयांना लाभ – ना.देशमुख

शासनाच्या कर्जमाफीचा 70 टक्के शेतकऱयांना लाभ – ना.देशमुख 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा 70 टक्के शेतकऱयांना लाभ झाला आहे. शेतकरी हुशार असल्याने ऑनलाईन अर्ज भरताना त्यांना त्रास झाला नाही. पण विरोधक त्याचा कांगावा करीत आहेत. यावरुन ऑनलाईन अर्जाचा त्रास हा त्यांना झाला असावा, असा उपरोधीत टोला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी लगावला. 21 लाख शेतकऱयांच्या अर्जात तफावत असल्याने त्याची तपासणी सुरु आहे. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ निश्चित मिळणार असून शेतकऱयांनी स्वतःच्या पायावर उभा राहणे गरजेचे आहे.

वाळवा तालुक्यातील तांबवे येथील श्री केशवराज विकास सोसायटीच्या शताब्दी महोत्सव सोहळया दरम्यान ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा.राजू शेट्टी, आ.शिवाजीराव नाईक, आ.मोहनराव कदम, आ.बाळासाहेब पाटील, मदनराव मोहिते, महेंद्र लाड, डॉ.इंद्रजित मोहिते, प्रकाश आष्टेकर, सहाय्यक निबंधक अमोल डफळे, प्रतापसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेस शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून सभासदांना चांदीचे नाणे भेट देण्यात आली. तसेच संस्थेच्या स्मरणीकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

देशमुख पुढे म्हणाले, सहकारामध्ये एखादी संस्था शंभर वर्षे चालणे म्हणजे जिकीरीचे आहे. मात्र यास श्री केशवराज विकास सोसायटी अपवाद आहे. या संस्थेने सहकारात आपला वेगळा ठसा उमठवला आहे. सभासदांना 14 टक्के पेक्षा जास्त लाभांश देता येत नसल्याने शताब्दीपुर्ती निमित्त सभासदांना चांदीचे नाण्याचे वाटप केले आहे. तसेच सभासदांनी आपला पैसा ठेव स्वरुपात गावातील बँकांमध्ये ठेवल्यास त्याचा फायदा गावच्या विकासासाठी निश्चित होवू शकतो.

यावेळी ना.खोत म्हणाले, सरकारने सोयाबिन पिकास चांगला दर दिला. शेतकऱयांना मार्केट समित्यात मतदानाचा अधिकार मिळवून दिला आहे. शेती ठिंबकखाली यावी म्हणून 700 कोटी पेक्षा जास्त निधी ठिंबकसिंचनाकरता देण्यात आला आहे. वाळवा तालुक्यातील रस्ते कामांसाठी 260 कोटीरुपये तर पाणीपुरवठा योजनांसाठी 76 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.

खा.शेट्टी म्हणाले, पुर्वीच्या लोकांनी सावकाराच्या छळास कंटाळून सहकारी संस्था उभा केल्या. मात्र सध्याचा काळ सहकारी सहकारी संस्था मोडीत काढायचा आहे. भाजपा सरकार भांडणे लावण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले, शेतकऱयांना कर्जमाफी देताना लावल्या गेलेल्या निकषांचा विचार झाला पाहिजे. वेगवेगळया भागातील शेतकऱयांना वेगवेगळे निकष असावेत. तसेच 34 हजार कोटींची कर्जमाफी झाली, असा दावा सरकार करत आहे. पण नेमका त्याचा लाभ कोणाला झाला हे सरकारने दाखवावे. ज्यांनी शेतकरी व सरकार यात मध्यस्थी केली ते आता मात्र काही बोलण्यास तयार नसल्याचा टोला ना.सदाभाऊ खोत यांचा नामोल्लेख टाळून शेट्टी यांनी लगावला.

यावेळी दिपक पाटील म्हणाले, श्री केशवराज सोसायटीस शंभर वर्षे पूर्ण झाली असून 25 कोटींच्या घरात संस्थेची उलाढाल आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून सभासदांना संस्थेच्या माध्यमातून फायदा मिळवून दिला जातो. चालूवर्षी 12 लाख रुपयांची चांदीची नाणी व भेट वस्तु सभासदांना दिल्या आहेत. यावेळी आ.शिवाजीराव नाईक, आ.बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

या समारंभ प्रसंगी युपीएससी परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवलेल्या श्रुती विनोद श्रीखंडे, वनाधिकारी पदी निवड झालेले सचिन शंकर गावडे, डेन्मार्क दौऱयासाठी निवड झालेले अजितकुमार सर्जेराव पाटील, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रतन मुकुंदराव पाटील यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष महादेव सुतार-पाटील, अविनाश मोरे, विलास जाधव, नेताजी पाटील, विक्रमसिंह पाटील, विश्वास जगताप, आनंदा शेळके, उपसरपंच विक्रम चव्हाण, अशोक पाटील, विजयकुमार नलवडे, बाळकृष्ण जाधव, हौसेराव शेळके, विजय पाटील, सर्जेराव जाधव, अवधुत पाटील, भास्कर मोरे, आनंदा गावडे, चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते.

मध्यस्थी करणारे अबोल का ?

या समारंभात खा.शेट्टी यांनी भाजपावर हल्ला चढवतानाच नामोल्लेख टाळून ना.खोत यांना चिमटे काढले. सरकारची कर्जमाफी फसवी आहे, असा आरोप करुन शेट्टी म्हणाले, कर्जमाफी आंदोलनात मध्यस्थी करणारे आता मात्र बोलत नाहीत. खा.शेट्टी व ना.खोत हे अनेक महिन्यांनी एका व्यासपीठावर आले. त्यामुळे उत्सुकता होती. या दोघांनीही भाषणा दरम्यान परस्परांची नावे घेतली, पण अखंड समारंभात परस्परांकडे पाहणेही टाळले. ना.खोत हे समारंभस्थळी उशिरा आले. त्यावेळी शेट्टी समर्थकांनी खा.शेट्टींचा जयघोष केला.